लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : अँटॉपहिल येथे एप्रिल महिन्यात एका जून्या मोटरगाडीमध्ये दोन चिमुकल्या मुलांचे मृतदेह सापडला होता. ती मोटरगाडी तेथे ठेवणाऱ्या राजकुमार संतोषपांडेविरोधात बुधवारी अँटॉपहिल पोलिसांनी निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे. मोटरगाडीमध्ये गुदमरून मुलाचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यानंतर याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

साजीद शेख(७) व मुस्कान(५) अशी मुलांची नावे आहेत. वडील मोहाब्बत शेख व आई मुस्कान यांच्यासह अँटॉपहिल परिसरात राहतात. ते दोघे २४ एप्रिल रोजी दुपारी खेळण्यासाठी बाहेर पडले. मात्र बराच वेळ झाला तरी ते परत न आल्याने कुटुंबियांनी शोध सुरू केला. मुले कुठेच न सापडल्याने अखेर त्यांच्या आई-वडिलांनी अँटॉप हिल पोलिस ठाण्यात धाव घेत मुल बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली.

आणखी वाचा-राज्यातील २२ केंद्रांवर ७ जुलै रोजी लेखी परीक्षा

पोलिसांनी तातडीने मुले बेपत्ता झाल्याची तक्रार केल्यानंतर पोलिसांनी मुलांचा शोध घेण्यास सुरूवात केला. त्यावेळी ते राहत असलेल्या परिसरातील सीसी टीव्ही चित्रीकरण तपासून आणि आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला पण मुले सापडली नाहीत. अखेर सायंकाळी पाऊणे आठच्या सुमारास एका महिला पोलिसाने मोबाईल टॉर्चने जुन्या मोटरगाडीत पाहिले असता आत मुले असल्याचे आढळून आले. मोटरगाडीचा दरवाजा उघडला असता ती बेशुद्धावस्थेत आढळली. त्यांना तातडीने शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. गुदमरल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झाले.

आरोपी राजकुमार याचा जून्या गाड्या खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. त्यातून त्याने २०१६ मध्ये ती मोटरगाडी घटनास्थळी ठेवली होती. त्याचा कोणातीही देखभाल केली नाही. त्यात या मुलांचा मोटरगाडीत गुदमरून मृत्यू झाला. कार्बन डायऑक्साईमुळे गुदमरून त्यांचा मृत्यू झाल्यामुळे तो अनैसर्गिक असल्याचे वैद्यकीय अहवालात नमुद करण्यात आले आहे.