मुंबईः मुलीच्या आईने भेटण्यास विरोध केल्यामुळे ३० वर्षीय तरूणाने १७ वर्षीय मुलीच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिल्याचा प्रकार अंधेरी पूर्व येथे घडला. याप्रकरणी अंधेरी एमआयडीसी पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. मुलगी गंभीर भाजली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. आरोपीने पेट्रोल ओतून पेटवून दिल्यामुळे पूजा विजय वाघमारे ६० टक्के भाजली असून ती कूपर रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. आरोपीही या घटनेत भाजल्यामुळे त्याच्यावरही सध्या उपचार सुरू आहेत.
पूजा तीन भावंड आणि पालकांसोबत अंधेरी (पूर्व) येथील मरोळ परिसरात राहते. तिचे वडील चालक असून, मोठा भाऊ खासगी कंपनीत काम करतो. तिची आई, वंदना वाघमारे (३८) या कपडे शिवण्याचे काम करतात. पूजाच्या आईने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, पूजा गेल्या दीड वर्षांपासून आरोपी जितेंद्र चंद्रकांत तांबे उर्फ जितूला ओळखत होती. तोही त्याच परिसरात राहतो. सुमारे सहा महिन्यांपूर्वी, शेजाऱ्याने पूजाच्या आईला ती जितूसोबत परिसरात फिरत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर पूजाच्या आईने जितूला समज दिली आणि तिला भेटण्यास मनाई केली. रविवारी उशिरा रात्री, पूजाच्या आईला एका स्थानिक व्यक्तीचा दूरध्वनी आला. त्याने पूजावर कोणीतरी पेट्रोल ओतून तिला पेटवल्याचे सांगितले. त्यानंतर पूजाची आई ताबडतोब घटनास्थळी पोहोचली आणि तिला पूजा अर्धवट भाजलेल्या अवस्थेत दिसली. त्यावेळी आईने विचारल्यावर “आई, माझी काही चूक नाही, जितूने माझ्यावर पेट्रोल टाकले आणि मला जाळले.”, असे पूजाने सांगितले.
पोलिसांच्या मदतीने गंभीर जखमी पूजाला त्वरित कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ती ६० टक्के भाजली आहे. पूजाचा चेहरा, मान, पाठ, पोट, दोन्ही हात आणि पाय भाजले आहेत. ती व्यवस्थित बोलू शकत नसल्याचे आईने तक्रारीत म्हटले आहे. पूजाच्या आईच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी आरोपी जीतूविरुद्ध हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जीतूही गंभीर भाजला असून त्यालाही त्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता अंतर्गत कलम १२४ (१) आणि १०९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या विभागाबाहेर पोलीस तैनात केला आहेत,” असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. मुलगी गंभीर जखमी असून तिच्यावरही रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.