लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे तत्कालीन अतिरिक्त पोलीस आयुक्त तुकाराम भाल यांच्यासह ३ सहाय्यक पोलीस आयुक्त, ३ पोलीस निरीक्षक आणि एका सरकारी वकिलाविरोधात फसवणूक आणि दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्याअन्वये गुन्हा दाखल झाला आहे. एका पोलीस निरीक्षकाला लाच प्रकरणी खोटय़ा गुन्ह्यात अडकविल्याप्रकरणी ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात हे गुन्ह्े दाखल करण्यात आले आहेत.
  माजी पोलीस निरीक्षक अशोक वाघमारे २००४ साली वसई पोलीस ठाण्यात कार्यरत होते. मच्छिमारांच्या वायरलेस यंत्रणेमध्ये पोलीस, सीमा शुल्क तसेच नौदलाचे संदेश ऐकू येत असल्याची माहिती वाघमारे यांना मिळाल्यानंतर त्यांनी याविरोधात कारवाई केली होती. त्यावेळी वायरलेस सेट लाच म्हणून मागितल्याचा ठपका ठेवत वाघमारे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती. त्यावेळेस तत्कालीन सरकारी वकील अशोक सासणे यांनी हे आरोप खोटे असल्याचा अहवाल तयार केला होता. मात्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी हा अहवाला दडवून वाघमारे यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले होते. याप्रकरणात वाघमारे यांना अटक करून त्यांना ३ वर्षांची शिक्षाही सुनावण्यात आली होती.
तर कसाब घुसू शकला नसता.
वायरलेस यंत्रणेतून पोलीस, नौदलाचे संदेश बाहेर जात होते. संभाव्य अतिरेकी शक्तींचा धोका लक्षात घेता मी त्यावर कारवाई सुरू केली होती. पण मी याप्रकरणाची पाळेमुळे खणू नये यासाठी मला खोटय़ा गुन्ह्यात अडकविण्यात आल्याचे वाघमारे म्हणाले. जर वायरलेस यंत्रणेच्या त्रुटीचा वेळीच शोध लागला असता तर कसाब आणि इतर अतिरेकी मुंबईत घुसू शकले नसते असेही त्यांनी सांगितले.
गुन्हा दाखल झालेले अधिकारी
टिकाराम भाल : तत्कालीन अतिरीक्त पोलीस आयुक्त, सध्या गृहनिर्माण
परांडे : तत्कालीन अप्पर पोलीस आयुक्त, सध्या निवृत्त
गोरे : तत्कालीन सहाय्यक पोलीस आयुक्त, सध्या निवृत्त
कचरे : तत्कालीन अप्पर पोलीस आयुक्त, सध्या निवृत्त
राजकुमार वालिया : तत्कालीन पोलीस निरीक्षक, सध्या निवृत्त
संजय जोशी : तत्कालीन पोलीस निरीक्षक, सध्या नागपूर मुख्यालय
अशोक सासणे : सरकारी वकील
सुधाकर घागरे : वरिष्ठ पोलीस निरीक्षक, ना म जोशी मार्ग
असे सत्य बाहेर आले
 सरकारी वकील सासणे यांना अन्य एका प्रकरणात अटक झाल्यानंतर त्यांच्या फायली जप्त करण्यात आल्या होती. वाघमारे यांनी माहिती अधिकारात ही कागदपत्रे मागविल्यानंतर या प्रकरणातील सत्य तब्बल ९ वर्षांनंतर समोर आले.