कल्याण डोंबिवली पालिका स्थायी समितीचे सभापती मल्लेश शेट्टी यांच्यासह सात जणांवर दंगल केल्याचा गुन्हा कोळसेवाडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी उमेश शिवान शेट्टी, प्रवीण वाघमारे, विष्णू सुतार, अजिंक्य आरोटे, प्रकाश गुप्ता व सूर्यकांत कांबळे यांना पोलिसांनी अटक केली आहे. मल्लेश शेट्टी यांना अटक करण्यात आलेली नाही. नेतिवली येथे राहणारे बांधकाम व्यावसायिक संदीप शिंदे यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी सांगितले, सतीश मुळीक हा पूर्वी सभापती शेट्टी यांच्याकडे चालक म्हणून काम करीत होता. नोकरी सोडून गेल्यानंतर सभापती शेट्टी व प्रवीणने त्याला नोकरी का सोडली व संदीप शिंदेबरोबर राहायचे नाही, अशी धमकी देऊन त्याला मारहाण केली. संदीप यांनी सतीशला पोलीस ठाण्यात नेले व पण तेथे मल्लेश शेट्टी व त्याच्या साथीदारांनी त्यांस अडविले. तेथे शिंदे व शेट्टी यांच्यात बाचाबाची झाली. शेट्टी गटातील आरोटे यांनी लोखंडी सळईने संदीप व त्याच्या मित्रांना बेदम मारहाण व शिवीगाळ केली. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मल्लेश शेट्टी यांना शांतता राखण्याची नोटीस पोलिसांनी बजावली होती. शेट्टी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा भ्रमणध्वनी बंद होता.

Story img Loader