मुंबई : धारावी येथील निसर्ग उद्यानालगतच्या परिसरातील गॅस सिलींडरच्या दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या दुर्घटनेत सुमारे ९ ते १० गाड्यांचे नुकसान झाले आहे. ट्रकमध्ये भरलेले गॅस सिलिंडर असतानाही रस्त्यावर अवैधरित्या वाहन उभे करणे, रस्त्यात वाहन उभे करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणे व वाहने उभी करण्यासाठी वाहनचालकांकडून पैसे आकारणे आदी बाबींमध्ये दोषी असलेल्या नऊ जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

४० सिलिंडरचे स्फोट

निसर्ग उद्यानालगतच्या रस्त्यावर एलपीजी गॅस सिलिंडरने भरलेला ट्रक उभा करण्यात आला होता. त्याच्या आसपास शिधा वाटपातील धान्य असलेल्या ट्रकसह अन्य मोटारी उभ्या होत्या. सोमवारी रात्री अचानक गॅस सिलिंडरच्या ट्रकला आग लागली. आगीची तीव्रता वाढल्याने काही वेळात ट्रकमधील सिलिंडरचे स्फोट होऊ लागले. सिलिंडरच्या स्फोटांमुळे आसपासच्या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. त्यांनी बचावासाठी मुख्य रस्त्यावर धाव घेतली. त्याठिकाणी गस्त घालणाऱ्या पोलिसांनी दुर्घटनेची माहिती अग्निशमन दलाला देताच अग्निशमन दलाच्या गाड्या दुर्घटनास्थळी पोहोचल्या आणि काहीच वेळात आग विझवण्यात आली. या दुर्घटनेत सुमारे ४० सिलिंडरचे स्फोट झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच, दुर्घटनेच्या दुसऱ्या दिवशीही पोलीस आणि अग्निशमन दलातील जवान घटनास्थळी तैनात होते. घटनास्थळी नाकाबंदी करण्यात आली होती. दिवसभर पंचनामा झाल्यांनतर व संपूर्ण धोका टळल्यानंतर मंगळवारी रात्री संबंधित मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.

अवैधरित्या वाहने रस्त्यात उभी

संबंधित मार्गावर गॅस सिलिंडरने भरलेला ट्रक वाहनचालकाने विनापरवाना उभा केला होता. यासंदर्भात पोलिसांकडून पूर्वीही वाहनचालकाला समज देण्यात आली होती. मात्र, तो पोलिसांना जुमानत नव्हता. २४ मार्च रोजीही वाहनचालकाने गॅस सिलिंडरने भरलेला ट्रक रस्त्यावर उभा केला. त्याच्या बाजूला अन्य मोटारी व शिधा वाटपातील धान्य असलेला ट्रक उभा करण्यात आला होता. त्यामुळे रत्स्यावरील वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याचे पोलिसांनी सांगितले. संबंधित वाहनचालकांकडून दोन इसमांनी पैसे घेऊन वाहने उभी करण्यास सांगितले होते. सोमवारी रात्री अचानक आग लागल्याने ट्रकमधील सुमारे ४० सिलिंडरचे स्फोट झाले. या दुर्घटनेत आसपास उभी असलेली सुमारे ९ वाहने जाळून खाक झाली. त्यात महापालिकेचा कचऱ्याची ने – आण करणारा ट्रकही होता. दुर्घटनाग्रस्त ट्रकमध्ये सुमारे १५० ते २०० गॅस सिलिंडर होते.

नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल

दरम्यान, गॅस सिलिंडर भरलेले वाहन रस्त्यावर अवैधरित्या उभे करणे, रस्त्यात वाहन उभे करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणे व वाहने उभी करण्यासाठी वाहनचालकांकडून पैसे आकारणे या प्रकरणी पोलिसांनी नऊ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. ट्रकचालक बाळू पुजारी, स्वयंपाकाच्या सिलिंडरचा पुरवठा करणारे निनाद केळकर, व्यवस्थापक नागेश नवले, टेम्पो चालक वेलु नाडार, सोनु चारमोहन, शिधावाटप दुकानाचे मालक अनिलकुमार गुप्ता, वाहने उभी करण्यासाठी वाहनचालकांकडून पैसे आकारणारे तरबेज शेख आणि तारीक शेख यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.