समाज माध्यमांवर अश्लील चित्रफीत प्रसारीत करण्याची धमकी देऊन ५४ वर्षीय व्यक्तीकडून दीड लाख रुपयांची खंडणी लुटण्याचा प्रकार वांद्रे परिसरात घडला. याप्रकरणी पैशांसाठी धमकी देणाऱ्या अज्ञात महिलेविरुद्ध वांद्रे पोलिसांनी फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायदयांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार मूळचे नेपाळचे रहिवासी असून सध्या ते वांद्रे येथील एका हॉटेलमध्ये स्वयंपाकी म्हणून काम करतात. गुरुवारी सकाळी नऊ वाजता ते त्यांच्या कामावर हजर झाले. त्यावेळी त्यांना एका अज्ञात क्रमांकावरुन व्हॉटसअपवर दूरध्वनी आला. दूरध्वनी स्वीकारल्यानंतर त्यांना समोर एक महिला नग्नावस्थेत असल्याचे दिसून आली. त्यामुळे त्यांनी दूरध्वनी बंद करुन तो क्रमांक डीलीट केला. त्यानंतर त्यांना एक चित्रफीत व्हॉटसअपवर पाठविण्यात आली. त्यात तक्रारदार आक्षेपार्ह स्थितीत होते.
हेही वाचा: पासपोर्टसाठी बनावट कागदपत्र सादर करणार्या त्रिकुटाला अटक
ती चित्रफीत समाज माध्यमांवर प्रसारीत करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडे पैशांची मागणी करण्यात आली. बदनामीच्या भीतीने त्यांनी तिला सुमारे दीड लाख रुपये पाठविले. तरीही ती त्यांना पैशांसाठी धमकी देत होती. या घटनेनंतर त्यांनी वांद्रे पोलीस ठाण्यात धाव घेऊन तेथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी संबंधित महिलेविरुद्ध फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदविला. या गुन्ह्यांचा वांद्रे पोलिसांसह सायबर पोलीसही समांतर तपास करत आहेत.