मुंबईः कुख्यात दाऊद इब्राहिम, लॉरेन्स बिष्णोई यांचे उद्दात्तीकरण करणारे टीशर्ट विकणाऱ्या विक्रेत्यांसह ई-कॉमर्स संकेतस्थळांविरोधात महाराष्ट्र सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दाऊद इब्राहिम व लॉरेन्स बिष्णोईचे छायाचित्र असलेली टीशर्ट्स या संकेतस्थळांवर विक्री करण्यात येत होती. त्यात फ्लिपकार्ट, अली एक्सप्रेस, टी शॉपर्स व इट्सी या प्रसिद्ध ई-कॉमर्स संकेतस्थळांसह त्यावर विक्री करणाऱ्या विक्रेत्यांचा समावेश असल्याची माहिती महाराष्ट्र सायबर विभागाकडून गुरुवारी देण्यात आली.
महाराष्ट्र राज्य सायबर विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाने सायबर सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. सायबर सुरक्षेच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून महाराष्ट्र सायबर विभाग समाज माध्यमांसह डिजिटल माध्यमांचीही तपासणी करत असते. यावेळी सामाजिक परिस्थितीवर विपरित परिणाम होईल, अशा पोस्ट सापडल्यास त्यावर तात्काळ कारवाई करण्यात येते. यावेळी तपासणीत नुकत्याच समोर आलेल्या माहितीवरून फ्लिपकार्ट, अली एक्सप्रेस, टी शॉपर्स व इट्सी सारख्या अनेक ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध गुंड लॉरेन्स बिष्णोई आणि दाऊद इब्राहिम यांच्या छायाचित्रांसह त्यांचे उदात्तीकरण करणारे टी-शर्ट विक्रीसाठी उपलब्ध होते. गुन्हेगारी जीवनशैलीचे उदात्तीकरण करणारी अशी उत्पादने युवा वर्गावर नकारात्मक प्रभाव टाकू शकतात. या प्रकारची सामग्री समाजाच्या नैतिक मूल्यांना हानी पोहोचवते आणि गुन्हेगारी प्रवृत्तींचे उदात्तीकरण करते. त्यामुळे तरुणांवर चुकीच्या गोष्टींचा प्रभाव पडू शकतो, असे नमूद करत कारवाई करण्यात आली आहे.
महाराष्ट्र सायबर विभागाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत फ्लिपकार्ट, अली एक्सप्रेस, टी शॉपर्स आणि इट्सी या ईकॉमर्स संकेतस्थळांविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलमांन्वये तसेच, माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायदा कलम ६७ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. महाराष्ट्र सायबर विभाग सुरक्षित डिजिटल वातावरण राखण्यासाठी आणि सार्वजनिक शांततेला धोका पोहोचवणाऱ्या सामग्रीला प्रतिबंध घालण्यासाठी कटिबद्ध असल्याचे यावेळी विभागाकडून सांगण्यात आले.
शोध कोणी लावला?
महाराष्ट्र सायबर पोलिसांचा विशेष कक्ष असून त्यात कार्यरत पोलीस प्रक्षोभक पोस्टमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, यासाठी संशयित पोस्टची तपासणी करत असतात. अत्यंत अद्ययावत प्रशिक्षण दिलेले हे दल अत्याधुनिक सॉफ्टवेअर, फिल्टर व टुल्सनी सज्ज आहे. ते विविध सॉफ्टवेअर्सच्या माध्यमातून समाज माध्यमांवर, संकेतस्थळांवर आक्षेपार्ह मजकूराचा शोध घेत असतात. त्यांना आक्षेपार्ह मजकूर आढळल्यास त्याची कसून तपासणी केली जाते. ती पोस्ट अथवा मजकूर आक्षेपार्ह आढळल्यास तो हटवला जातो. तसेच अतिगंभीर प्रकरणांमध्ये तात्काळ गुन्हाही दाखल केला जातो.