मुंबई : केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आमदार आणि उद्योजक रत्नाकर गुट्टे आणि गंगाखेड शुगर अँड एनर्जी लिमिटेड यांच्या विरोधात ४०९ कोटी रुपयांच्या कथित बँक फसवणुकीप्रकरणी गुन्हा दाखल केला. दिल्ली सीबीआयने गुरुवारी संबंधित गुन्हा दाखल केल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली.
गुट्टे हे गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत. सीबीआयने दाखल केलेल्या प्रकरणात गंगाखेड शुगर अँड एनर्जी, परभणी, रत्नाकर गुट्टे, विष्णू मुंडे, कल्पना गुट्टे, सुनील गुट्टे, विजय गुट्टे व इतर अनोळखी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. गुट्टे हे गंगाखेड शुगर अँड एनर्जी लिमिटेडच्या संचालकांपैकी एक आहेत. तक्रारीनुसार गंगाखेड शुगर अँड एनर्जी लिमिटेडने २००८ ते २०१५ दरम्यान युको बँकेच्या नेतृत्वाखालील बँकांच्या संघाकडून मुदत कर्ज, भांडवल सुविधा आणि इतर पत सुविधांच्या रूपात ५७७ कोटी १६ लाख रुपयांची विविध कर्जे घेतली. याप्रकरणी सीबीआयने नुकतेच नागपूर येथे दोन आणि परभणी येथे तीन ठिकाणी शोधमोहीम राबवली. युको बँकेचे उपमहाव्यवस्थापक मनोज कुमार आनंद यांनी याप्रकरणी सीबीआयकडे तक्रार केली होती.