मुंबई: काम संपवून घरी जात असलेल्या एसटीच्या वाहकाने महिला प्रवाशाची एसटीत छेड ककाढल्याचा प्रकार मंगळवारी रात्री चेंबूर परिसरात घडला. याबाबत महिला प्रवाशाच्या तक्रारीवरून गोवंडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तो भोईवाडा पोलिसांकडे वर्ग केला. सदर तक्रारदार तरुणी तिच्या आजीला सोडण्यासाठी लालबाग येथून सातारा येथे जात होती. याच बसमधून वाहक विलास मुंडे काम संपवून नवी मुंबईत घरी जात होता. त्याने बसमधील महिला प्रवाशाची छेड काढण्यास सुरुवात केली.

बराच वेळ त्याचा हा प्रकार सुरू असल्याने अखेर महिलेने ही बाब वाहकाला सांगितली. वाहकाने तात्काळ बस चेंबूर परिसरात थांबवून आरोपीला याच ठिकाणी उतरवले. या घटनेनंतर प्रवाशांनी बराच वेळ ही बस चेंबूर परिसरात रोखून धरली होती. अखेर बसमधील वाहकाने याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि प्रवाशांची समजूत काढली. त्यानंतर तरुणीला पोलीस ठाण्यात नेण्यात आले.

तिच्या तक्रारीवरून आरोपी विलास मुंडे विरोधात गुन्हा दाखल केला. मात्र ही घटना लालबाग परिसरातील असल्याने हा गुन्हा भोईवाडा पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच राज्य परिवहन विभागाने आरोपी विलास मुंडे याच्यावर निलंबनाची कारवाई केली असून तसे पत्र त्याला विभागाकडून देण्यात आले.