मुंबई : स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने एकनाथ शिंदे आणि शिवसेनेवर विडंबनात्मक गाणे सादर केल्याने वाद निर्माण झाला आहे. त्याबाबत कुणाल कामराविरोधात गुन्हाही दाखल झालेला आहे.शिवसैनिकांनी खार भागात असलेल्या युनिकॉन्टिनेंटल स्टुडिओची तोडफोड केली. याप्रकरणी शिवसेनेकडून(शिंदे गट) एमआयडीसी पोलिसांकडे कुणाल कामराविरोधात तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवसेना नेते मुरजी पटेल यांनी याप्रकरणी तक्रार केली आहे. तक्रारीनुसार २३ मार्चला त्यांनी एका कार्यक्रमात असताना मला माझ्या मोबाईल फोनवर आमच्या पक्षाच्या एका कार्यकर्त्या मार्फत पाठवण्यात आलेली लिंक प्राप्त झाली. त्यात कुणाल कामरा याने कॉन्टीनेन्टल हॉटेल, रोड नं ०३, खार पश्चिम, मुंबई याठिकाणी केलेल्या एका स्टॅण्डअप कॉमेडी शोच्या कार्यक्रमाची व्हिडीओ क्लिप प्रसारित केली होती. ती पाहिली असता त्यात कामरा स्टॅण्डअप कॉमेडी शोमध्ये त्याने शिवसेना व शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांची बदनामी केली. ठाणे जिल्ह्यातील एक नेते असा उल्लेख करून त्यांनी विडंबनात्मक गाणे गायले. त्यामुळे एकमेकांप्रतीच्या भावना कलुशित होवून दोन राजकीय पक्षांमध्ये व्देष भावना उत्पन्न होत आहेत, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री असल्याचे माहिती असून त्यांच्या नैतिक आचरणावर निंदाजनक वक्तव्य करून त्यांची बदनामी केली. तसेच आमच्या पक्षाच्या व आमच्या प्रतिस्पर्धी राजकीय पक्षांच्या एकमेकांप्रतीच्या भावना कलुषित करून दोन राजकीय पक्षांमध्ये व्देष भावना उत्पन्न केल्या म्हणून माझी त्याच्या विरोधात कायदेशीर तक्रार आहे, असे तक्रारीत म्हटले आहे.

दुसरीकडे खार येथील कामराच्या कार्यक्रमाच्या स्टुडिओमध्येही शिवसैनिकांनी तोडफोड केली. खारमधील तोडफोडीप्रकरणी राहुल कनाल, कुणाल सरमळकर, अक्षय पनवेलकर, गोविंद पडी, राहुल तुरबाडकर, विलास चावरी, अमिन शेख, समीर महापदी, हिमांशू, शशांक कोदे. संदीप मालप, गणेश राणे, शोभा पालवे, कृष्णा ठाकूर, पवनज्योत सेठी, कल्पेश, कुरेशी हुजेफ, चांद शेख तसेच १५ ते २० कार्यकर्त्यांविरोधात सोमवारी पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम १३२, १८९(२), १८९(३), १९०, १९१(२), ३२४(५), ३२४(६), २२३, ३५१(२), ३५२, ३३३, ३७(१), १३५ अंतर्गत खार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

खार पोलिसांनी स्वतः याप्रकरणी तक्रार केली आहे. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक विजय सैद यांच्या तक्रारीवरून खार पोलिसांनी सोमवारी पहाटे याप्रकरणी गुन्हा दाखल केला. तक्रारीनुसार, पोलिसांच्या तीन मोबाईल व्हॅन घटनास्थळी पोहोचल्या असता स्टुडिओमध्ये कार्यकर्ते शिवसेना जिंदाबाद अशा घोषणा देत होते. त्यांनी तेथे जाऊन शो बंद केला. तसेच तेथील नागरिकांना बाहेर काढले. तेथील कार्यरत कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली व शिवीगाळ केली. लोकांना हॉटेलमधून बाहेर जाण्यासाठी सांगत असताना तेथे मोठा जमाव होता. त्यावेळी स्थानिक नेते राहुल कनालसह कार्यकर्त्यांची गर्दी होती, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.