अनिश पाटील
मुंबई : बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात याचिका करणाऱ्या गौरी भिडे आणि त्यांच्या वडिलांविरोधातच न्यायालयात दोन खटले प्रलंबित असल्याचे उघड झाले आहे. उद्धव ठाकरे यांच्या कथित बेहिशेबी मालमत्तेबाबत गौरी भिडे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेत केंद्र सरकार, राज्य सरकार, सीबीआय, ईडीसह उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य आणि तेजस ठाकरे यांनाही प्रतिवादी करण्यात आले आहे. या प्रकरणी ईडी आणि सीबीआयमार्फत चौकशी करण्याचे आदेश देण्याची मागणी करण्यात आली. त्यापूर्वी, भिडे यांनी या प्रकरणी मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली होती. आता भिडे आणि त्यांच्या वडिलांविरोधातही दोन खटले प्रलंबित असल्याची माहिती कागदपत्रांद्वारे उघड झाली आहे.
पहिल्या प्रकरणात एका बँकेने खासगी कंपनीविरोधात दाखल केलेल्या याचिकेत कंपनीच्या संचालकासह गौरी भिडे यांचे नाव आहे. तसेच गौरी यांचे वडील अभय भिडे यांच्या विरोधातही २००३ पासून एक प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. याप्रकरणी मालाड विभागातील तत्कालीन भविष्य निर्वाह निरिक्षक जयसिंह रणखांबे यांनी चारकोप पोलिसांत तक्रार केली होती.
पंधरा वर्षांपासून खटला प्रलंबित
या प्रकरणी गौरी भिडे यांच्या वडिलांची मालकी असलेल्या मुद्रणालयातील कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम खात्यात न भरल्याचा आरोप आहे. हा खटला गेल्या पंधरा वर्षांपासून प्रलंबित आहे. याबाबत गौरी भिडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपल्याविरोधात कुठलेही गुन्हेगारी स्वरूपाचे प्रकरण नसल्याचे सांगितले. गौरी भिडे या स्वत: प्रकाशक आहेत. त्यांच्या आजोबांचे ‘राजमुद्रा’ नावाचे प्रकाशन आहे. ‘सामना’ आणि ‘मार्मिक’च्या विक्रीतून एवढी संपत्ती गोळा करणे अशक्य असल्याचा आरोप गौरी भिडे यांनी ठाकरे यांच्यावर केला आहे. आपलाही हाच व्यवसाय असून दोघांच्या उत्पन्नात एवढा फरक कसा? असा प्रश्नही गौरी यांनी याचिकेद्वारे उपस्थित केला आहे. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून प्राथमिक चौकशी सुरू आहे.
आपल्याविरोधात कुठलेही गुन्हेगारी स्वरूपाचे प्रकरण नाही. मी एका कंपनीच्या संचालकांसाठी हमीदार होते. त्यामुळे त्या प्रकरणात माझे नाव आहे. वडिलांविरोधातील प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे. या सर्व प्रकरणांमध्ये पुराव्यासह बाजू मांडू.
– गौरी भिडे