शिवसेना पक्षातून राष्ट्रवादीत प्रवेश केलेले कल्याण-डोंबिवली मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार आनंद परांजपे यांच्या जनसंपर्क कार्यालयाजवळून सुमारे १ लाख २१ हजारांची रोकड मिळाल्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. एका अज्ञात व्यक्तीने पोलिसांना दूरध्वनीवरून परांजपे यांच्या कार्यालयाजवळ पैसे वाटले जात असल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता परांजपे यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर रिक्षावाले आणि अनेक कार्यकर्त्यांची गर्दी आढळली. या गर्दीतील काही कार्यकर्त्यांकडून पोलिसांनी पैशाने भरलेली पाकिटे जप्त केली आहेत. त्यांच्याकडून तब्बल १ लाख २१ हजारांची रोख रक्कम जप्त करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. याप्रकरणी मानपाडा पोलिसांकडून दोन जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या पैशांचा वापर मतदारांना भुलविण्यासाठी केला जात होता का? या पैशांचे वाटप आनंद परांजपे यांच्या सांगण्यावरून केले जात होते का? या सगळ्याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. 

Story img Loader