मुंबई, ठाण्यासह राज्यातील काही ‘लॉटरी’ विक्री केंद्रांमध्ये छुपा व्यवहार

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

निश्चलनीकरणानंतर मुंबई, ठाण्यासह राज्यात अनेक ठिकाणी रोकडरहित मटका चालविला जात आहे.  राज्याने मटका उद्ध्वस्त करण्याचे ठरविल्यानंतर त्यावर एक अंकी लॉटरीचा पर्याय शोधून काढणाऱ्यांनी चिठ्ठी मटकाही सुरू केला होता. नोटांची टंचाई कमी झाल्यानंतर गेल्या महिन्यापासून बेकायदा धंद्यांना फटका बसला होता. पण रोकडरहित व्यवहाराद्वारे मटका पुन्हा सुरू झाल्याचे सांगण्यात येते.

मुंबईत प्रामुख्याने दादर पश्चिम व पूर्व परिसरात काही अधिकृत तर काही अनधिकृत लॉटरी केंद्रांवर राजरोसपणे मटका खेळला जात आहे. याशिवाय ठाणे, डोंबिवली, पुणे तसेच राज्याच्या विविध भागांत राज्यांच्या लॉटऱ्या विकण्याच्या नावाखाली  मटका खेळला जात आहे. मटक्यासाठी जे आकडे लावले जातात त्यासाठी या लॉटऱ्यांवरील शेवटच्या तीन क्रमांकाचाच वापर केला जात आहे. हा मटका खेळणाऱ्यांना सुरुवातीला त्यांच्याकडील रोख रक्कम द्यावीच लागते, मात्र ‘बक्षिसा’ची रक्कम रोकड स्वरूपात न देता एका चिठ्ठीवर लिहून दिली जाते. सारे काही विश्वासावर चालते, असे एका बुकीने सांगितले. आमच्याकडे येणारे ठरावीक लोक असतात. त्यांचा आमच्यावर विश्वास असतो. सुरुवातीला विशिष्ट रक्कम दिल्याशिवाय त्यांना मटका खेळता येत नाही. मटक्याचा आकडा लागला तरी आम्ही शक्यतो रोख रक्कम देत असतो, परंतू निश्चलनीकरणानंतर नोटांची टंचाई असल्यामुळे चिठ्ठीवर जिंकलेली रक्कम लिहून दिली जाते. या चिठ्ठीनुसार त्याला रक्कम दिली जाते वा त्याला पुन्हा ती रक्कम मटक्यावर खेळता येते. हा विश्वासाचा खेळ असल्यामुळे त्यात फसवणूक होत नाही, असा दावाही त्याने केला.

मटक्यासाठी आकडे लावण्याची पद्धत जुनी आहे, परंतु अनेक ठिकाणी चिठ्ठी वा डिजिटल मटका सुरू करण्यात आला आहे. संबंधित बुकी मनातले कुठलेही आकडे लावण्यापेक्षा विविध राज्यांच्या लॉटऱ्यांच्या विजयी क्रमांकातील शेवटचे क्रमांक मटक्यासाठी वापरत आहेत. एक अंकी मटक्यासाठी शेवटचा क्रमांक, तर जोडीसाठी विभिन्न राज्याच्या लॉटऱ्यांमधील शेवटचे क्रमांक घेतले जातात. तीन अंकांसाठी बऱ्याच वेळा विजयी लॉटरीतील शेवटचे तीन क्रमांकही घेण्याची पद्धत आहे वा तीन राज्यांच्या लॉटऱ्यांमधील शेवटचे विजयी क्रमांक घेतले जातात, याकडे सूत्रांनी लक्ष वेधले.

विविध राज्यांतील लॉटऱ्यांची विक्री गेल्या काही वर्षांत खूपच कमी झाली आहे. लॉटरी विक्री केंद्र असेल तर शक्यतो कारवाई होत नाही. त्यामुळे या केंद्राच्या आड छुप्या स्वरूपात मटका खेळला जातो. सर्वच केंद्रांवर असे चालते असे म्हणणे योग्य होणार नाही. मटक्यावर गदा आल्यामुळे चिठ्ठी मटक्याच्या रूपाने नवा अवतार आला आहे – नानासाहेब कुटे-पाटील, अध्यक्ष, बुलंद छावा संघटना

मुंबईत कुठेही मटका सुरू नाही. मटका नव्या अवतारात सुरू असल्यास त्याची माहिती घेऊन कारवाई केली जाईल  – देवेन भारती, सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था)

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cashless transaction in matka gambling