जातिव्यवस्था नष्ट करण्यासाठी शाळेच्या दाखल्यावरून जात हद्दपार करा, या भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या मागणीने खळबळ उडवली असतानाच प्रत्यक्षात शाळेत नाव नोंदवताना जात सांगण्याची कोणतीही सक्ती नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या जात नोंदविण्याची कोणतीही सक्ती नाही, अशी माहिती शालेय शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
शाळा सोडल्याच्या दाखल्यावरून जात काढून टाकण्याची मागणी रिपब्लिकन नेते प्रकाश आंबेडकर यांनी केल्याने यासंदर्भात चर्चा सुरू झाली आहे. वास्तविक शाळा सोडताना विद्यार्थी कितवीपर्यंत शिकला आहे आणि त्याची वैयक्तिक माहिती देणारे ते एक प्रमाणपत्र असते. पण प्रथेनुसार ते जन्म, जात, धर्म याची माहिती देणारे महत्त्वाचे प्रमाणपत्र ठरले आहे. वास्तविक विद्यार्थ्यांला शाळेत दाखल करताना त्याचे पालक जी जन्मतारीख, जात, धर्म सांगतील, ती शाळेत नोंदवून घेतली जाते. त्याची कोणतीच तपासणी, छाननी केली जात नाही किंवा कोणतेही पुरावेही मागितले जात नाहीत. जी माहिती शाळेच्या दफ्तरी आहे, ती शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्रावर नोंदविली, तर ते विद्यार्थ्यांच्या पुढील आयुष्यासाठी महत्त्वाचे प्रमाणपत्र ठरते. मात्र, यासाठी जात सांगण्याची कोणतीही सक्ती विद्यार्थी वा त्यांच्या पालकावर केली जात नाही. त्यामुळे ज्यांना कोणतेही लाभ घ्यायचे नाहीत, त्यांनी जात सांगितली नाही, तरी चालू शकते, असे शालेय शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
पूर्वी प्रसुती घरीही होत असल्याने अर्भकाच्या जन्माची नोंद शासकीय दफ्तरी होईलच, याची खात्री नव्हती. प्रत्येकाकडे जन्मदाखला नसल्याने शाळा सोडल्याचा दाखला हे अधिकृत प्रमाणपत्र मानले गेले. पण गेल्या काही वर्षांत ९८-९९ टक्के जन्म नोंदले जाऊ लागले आहेत. त्यामुळे जन्मदाखलाही उपलब्ध होत आहे. स्वाभाविकच शाळा सोडल्याच्या दाखल्याचे महत्त्व हळूहळू कमी होत जाणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा