मुंबई : मुंबईतील मांजरांची वाढती संख्या नियंत्रित करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने निर्बीजीकरणाच्या प्रक्रियेला वेग दिला आहे. या उपक्रमांतर्गत आजवर १८ हजार ८०८ मांजरांचे निर्बीजीकरण करण्यात आले आहे. चालू आर्थिक वर्षात ११ हजार मांजरांच्या निर्बीजीकरणाचे लक्ष्य होते, त्यातील ४६ टक्के पूर्ण करण्यात आले आहे. मार्च २०२५ पर्यंत ते पूर्ण केले जाईल.
पालिका कार्यक्षेत्रातील प्राण्यांच्या आरोग्यासाठी पालिकेने लसीकरण, प्राणिगणना, आरोग्य तपासणी, निर्बीजीकरण मोहिमा राबवल्या आहेत. प्राणी अधिवास आढाव्यात महापालिकेला २०१८ मध्ये मांजरांच्या वाढत्या संख्येबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. मुंबईतील बहुतांश रस्ते, चौक, शाळा, प्रशासकीय कार्यालये, तसेच रुग्णालयांत मोठ्या प्रमाणात मांजरांचा वावर वाढल्याचे निदर्शनास आले होते. शिवाय, प्राणिप्रेमींनीही पालिकेला मांजरांच्या निर्बीजीकरणाची शिफारस केली होती. त्यानुसार प्रशासनाने अंमलबजावणी सुरू केली. दरम्यान, महापालिकेने भारतीय जीवजंतू कल्याण मंडळाला पत्र पाठवून संबंधित समस्येकडे लक्ष वेधल्यानंतर देशातील सर्व पालिकांसाठी श्वानांसह मांजरांचेही निर्बीजीकरणाच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या. मांजरांच्या संख्येवर विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी केवळ ७० टक्के निर्बीजीकरणास मान्यता देण्यात आली आहे.
u
देशात प्रथमच
देशात प्रथमच मांजरांचे निर्बीजीकरण करण्यास मुंबई महानगरपालिकेने सुरुवात केली. दक्षिण मुंबईत मांजरांची संख्या तुलनेने अधिक असून या परिसरातील मांजरांचे निर्बीजीकरण मोठ्या प्रमाणावर करण्यात आल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
वेल्फेअर ऑफ स्ट्रे डॉग, बीएसपीसीए, मुंबई व्हेटर्नरी कॉलेज, अहिंसा, इन डिफेन्स ऑफ अनिमल्स, उत्कर्ष ग्लोबल फाऊंडेशन व जीव रक्षा अॅनिमल वेल्फेअर ट्रस्ट या संस्था हा उपक्रम राबवत आहेत.
४६ टक्के लक्ष्य पूर्ण
महापालिकेने आजवर शहर आणि उपनगरांतील एकूण १८,८०८ मांजरांचे निर्बीजीकरण पूर्ण करण्यात आले. गेल्या आर्थिक वर्षात एकूण ७,७०८ मांजरांचे निर्बीजीकरण करण्यात आले होते. चालू आर्थिक वर्षात महापालिकेने ११ हजार मांजरांच्या निर्बीजीकरणाचे लक्ष्य ठेवले असून ऑक्टोबरपर्यंत सुमारे ४६ टक्के म्हणजेच ५,०५७ मांजरांचे निर्बीजीकरण करण्यात आले.
हेही वाचा – मुंबई : ११ वी प्रवेश गैरप्रकार, विशेष पथकामार्फत तपास
वर्ष – निर्बीजीकरण
● २०१९ – ६६१
● २०२० – १५८०
● २०२१ – २२८०
● २०२२ – १५२२
● २०२३ – ७७०८
● २०२४ (ऑक्टोबरपर्यंत) – ५०५७