अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासाला तब्बल पाच वर्षानंतर मोठ यश मिळालं आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेक्षण विभाग सीबीआयने शनिवारी पुण्यातून सचिन प्रकाशराव अंधुरे याला अटक केली. सचिन अंधुरेनेच नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडल्या. नालासोपाऱ्यात सापडलेल्या स्फोटक प्रकरणाचा तपास करताना डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचे धागेदोरे मिळाले.
नालासोपारा स्फोटक प्रकरणात अटकेत असलेल्या शरद कळसकरच्या चौकशीतून सचिन अंधुरेचे नाव समोर आले. सचिन आणि शरद दोघे मित्र आहेत. एटीएसने दोन दिवसांपूर्वी औरंगाबादमधून सचिनला ताब्यात घेतले. त्याचा गुन्ह्यात सहभाग असेल तर त्याला अटक केली जाईल अन्यथा सोडून देऊ असे एटीएस अधिकाऱ्यांनी सचिनच्या कुटुंबियांना सांगितले होते. त्याचा गुन्ह्यातील सहभाग समोर आल्यानंतर त्याला अटक करुन सीबीआयकडे सोपवण्यात आले.
शरद कळसकर आणि सचिन अंधुरे दोघे औरंगाबादचे आहेत. कळसकर केसापुरी गावचा रहिवासी आहे तो कोल्हापूर नोकरीला असल्याचे सांगायचा. सचिन अंधुरे कुंवारफल्ली राजाबाजार येथे राहतो. निराला बाजार येथे एका कपडयाच्या दुकानात तो कामाला आहे. पत्नी, भाऊ आणि एक वर्षाची मुलगी असा त्याचा परिवार आहे. मे महिन्यात औरंगाबादमध्ये झालेल्या दंगलीत त्याचा सहभाग असल्याची माहिती मिळाली आहे. सचिनच्या फेसबुक अकांऊटवरुन तो हिंदुत्ववादी विचारसरणीचा असल्याचे स्पष्ट झाले.
श्रीकांत नावाच्या आणखी एका व्यक्तिला जालन्यातून अटक करण्यात आली असून त्यामुळे पुढच्या काही दिवसात आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.
CBI today arrested Sachin Prakasrao Andure of Aurangabad (Maharashtra) in connection with Dabholkar murder case, further investigation is underway.
— ANI (@ANI) August 18, 2018
नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा मागच्या पाचवर्षांपासून तपास सुरु आहे. सचिन अणदुरेच्या अटकेने या संपूर्ण कटाचा उलगडा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. २० ऑगस्ट २०१३ रोजी नरेंद्र दाभोलकर पुण्यात असताना मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले होते. त्यावेळी सकाळी आठ ते साडे आठ दरम्यान त्यांची गोळया झाडून हत्या करण्यात आली होती. दोन अज्ञात बंदुकधाऱ्यांनी अत्यंत जवळून त्यांच्यावर चार गोळया झाडल्या होत्या. रक्ताच्या थारोळयात कोसळलेल्या दाभोलकरांचा जागीच मृत्यू झाला होता.
डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि डॉ. गोविंद पानसरे या दोन्ही हत्या प्रकरणात तपासाच्या प्रगतीबद्दल मुंबई उच्च न्यायलयाने नाराजी व्यक्त करुन सीबीआय आणि विशेष तपास पथकाची (एसआयटी) कानउघडणी केल्यानंतर दोन आठवडयांनी ही अटकेची कारवाई झाली आहे.
न्यायाधीश एससी धर्माधिकारी आणि न्यायाधीश भारती दानग्रे यांच्या खंडपीठासमोर दाभोलकर आणि पानसरे हत्या प्रकरणांच्या याचिकांवर सुनावणी झाली. न्यायालयाच्या देखरेखीखाली तपास व्हावा अशी मागणी या याचिकेत करण्यात आली होती. त्यावेळी न्यायालयाने राज्यातील स्थिती समाधानकारक नाही. पोलिसांवर दगड फेकले जात आहेत. जमाव रस्त्यावर आहे. बस जाळल्या जात आहेत. हे सर्व दु:खद आहे असे निरिक्षण न्यायालयाने नोंदवले होते.
दोन्ही हत्या प्रकरणातील मारेकऱ्यांना पकडू न शकल्याबद्दल न्यायालयाने सीबीआय आणि एसआयटी दोघांची कानउघडणी केली होती. तुम्ही अधिकारी काश्मीर ते त्रिपुरापर्यंत प्रवास करता पण रिकाम्या हाताने परत येता या शब्दात सुनावले व तपास अहवाल स्वीकारण्यास नकार दिला. सरकार बदलतील पण तुम्हाला तपास करावा लागेल. तुम्ही तुमच्या अहवालात तेच तेच सांगत आहात. अजून तपासात प्रगती का नाही झाली ? असा सवाल न्यायालयाने विचारला होता.