अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास आपल्याकडे घेण्याबाबतचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) बुधवारी उच्च न्यायालयात सांगितले. विशेष म्हणजे सीबीआयच्या या वक्तव्यानंतर तपास सोपवण्याबाबत न्यायालयाने आदेश दिलेले नसताना अथवा सरकारनेही तपास वर्ग करण्याबाबत अधिसूचना काढल्याशिवाय अशाप्रकारे सीबीआय तपास स्वत:कडे घेऊ शकते का, अशी विचारणा न्यायालयाकडून करण्यात आली.   
दाभोलकरांच्या हत्येचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्याची मागणी केतन तिरोडकर यांनी याचिकेद्वारे केली असून न्या. पी. व्ही. हरदास आणि न्या. अजय गडकरी यांच्या खंडपीठासमोर त्यावर सुनावणी झाली. याबाबत भूमिका मांडावी, असे आदेश न्यायालयाने सीबीआयला दिले होते. त्या वेळी या प्रकरणाचा तपास आपल्याकडे घेण्याबाबतचा प्रस्ताव मुख्यालयाकडे पाठविण्यात आल्याचे आणि तो विचाराधीन असल्याचे सीबीआयने न्यायालयात सांगितले. या प्रकरणी आता ६ मे रोजी सुनावणी होणार आहे.
दुसरीकडे न्यायालयाने या प्रकरणी मुख्य सूत्रधारांना अटक करण्यात आली का, अशी विचारणा पोलिसांकडे केली. तेव्हा मुख्य सूत्रधार अद्याप सापडलेले नसल्याचे आणि ज्यांना अटक झाली होती त्यांनाही कनिष्ठ न्यायालयाने आरोपपत्र दाखल न केले गेल्याने जामीन मंजूर केल्याचे सांगितले.
दरम्यान, या प्रकरणी हस्तक्षेप याचिका करणाऱ्या दाभोलकर यांच्या मुलीच्या वतीने तपास कुणाकडेही वर्ग करण्यास आपली हरकत नसल्याचे स्पष्ट केले गेले. हा तपास उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली व्हावा, अशी मागणीही तिच्यावतीने करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा