कामगार नेते डॉ. दत्ता सामंत यांच्या १९९७ मध्ये झालेल्या हत्या प्रकरणातून कुख्यात गुंड छोटा राजन याची विशेष सीबीआय न्यायालयाने शुक्रवारी पुराव्यांअभावी निर्दोष सुटका केली. राजन याने सामंत यांची हत्या करण्याचा कट रचला होता हे सिद्ध करणारा कोणताही ठोस पुरावा न्यायालयात सादर करण्यात आलेला नाही, असे निरीक्षण विशेष न्यायालयाने राजन याची या प्रकरणातून निर्दोष सुटका करताना नोंदवले.
हेही वाचा >>> लंडनमधून आलेल्या तरूणीवर मुंबईत अत्याचार; अत्याचाराचा व्हिडिओ स्नॅपचॅटवर प्रसारित
डॉ. सामंत यांच्या चालकासह खटल्यातील महत्त्वाचे साक्षीदार फितूर झाले. त्यांनी सीबीआयच्या दाव्याला समर्थन देण्यास नकार दिला. परिणामी, आरोपीवरील आरोप सिद्ध करण्यासाठी अन्य साक्षीदारांची साक्ष पुरेशी नाही, असेही न्यायालयाने सीबीआयच्या तपासावर ताशेरे ओढताना नमूद केले. प्राथमिक तपासादरम्यान मुंबई पोलिसांनी गोळा केलेल्या पुराव्यांवर राजन याच्याविरोधातील खटला प्रामुख्याने चालवण्यात आला. राजन याची या प्रकरणातून निर्दोष सुटका झाली असली तरी त्याच्यावर बरेच खटले सुरू असल्याने तो कारागृहातच राहणार आहे.
हेही वाचा >>> कारागृहात गळफास लावून आरोपीची आत्महत्या
सामंत यांनी १९८१ मध्ये मुंबईत कापड गिरणी कामगारांच्या संपाचे नेतृत्त्व केले होते. दीर्घकालीन संप म्हणून या संपाची ओळख आहे. सामंत यांची १६ जानेवारी १९९७ रोजी पंतनगर, घाटकोपर येथे गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. सामंत हे त्यांच्या गाडीने कार्यालयात जात असताना हा हल्ला करण्यात आला होता. दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर १७ गोळ्या झाडल्या होत्या. राजन याने सामंत यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप सीबीआयने केला होता. खटल्याच्या पहिल्या टप्प्यात म्हणजेच, जुलै २००० मध्ये निकाल देण्यात आला. राजन याला अटक करण्यात आल्यावर त्याच्यावर स्वतंत्र खटला चालवण्यात आला. या प्रकरणी कुख्यात गुंड गुरू साटम आणि राजन याचा हस्तक रोहित वर्मा यांना फरारी आरोपी म्हणून दाखवण्यात आले आहे.