अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपविण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायलयाने शुक्रवारी दिला. दाभोलकर हत्येचा तपास करण्यास तयार असल्याचे सीबीआयने शुक्रवारी न्यायालयात स्पष्ट केले. त्यानंतर हा तपास त्यांच्याकडे देण्याचा निर्णय न्यायालयाने घेतला.
दाभोलकरांच्या हत्येचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्याची मागणी केतन तिरोडकर यांनी याचिकेद्वारे केली होती. याबाबत भूमिका मांडावी, असे आदेश न्यायालयाने सीबीआयला दिले होते. यापूर्वी या प्रकरणाचा तपास आपल्याकडे घेण्याबाबतचा प्रस्ताव मुख्यालयाकडे पाठविण्यात आल्याचा आणि तो विचाराधीन असल्याचे सांगणाऱ्या सीबीआयने गुरुवारी झालेल्या सुनावणीत प्रकरणाचा तपास आपल्याकडे वर्ग करण्याची गरज नसल्याचे न्यायालयात सांगितले होते.
डॉ. दाभोलकर यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या पुणे पोलिसांच्या तपासावर आतापर्यंत कुठल्याही प्रकारचा आरोप करण्यात आलेला नाही. त्यामुळे तपासाची सूत्रे आपल्याकडे वर्ग करण्याची गरज नसल्याचे सीबीआयच्या वकिलांनी सांगितले. आपल्या या दाव्यासाठी सीबीआयने सर्वोच्च न्यायालयाच्या काही निकालांचा दाखलाही दिला. याचिकाकर्त्यांनी मात्र तपास सीबीआयनेच करावा, अशी मागणी केली होती. याप्रकरणी तीन राज्यांतून आरोपींना अटक करण्यात आली आहे. शिवाय आरोपी दुबईला पळून गेल्याची माहितीही पोलिसांना मिळाली आहे. या सगळ्या पाश्र्वभूमीवर सीबीआयच या प्रकरणाचा तपास करू शकते, असा दावा करीत याचिकाकर्त्यांनी तपास सीबीआयकडे वर्ग करण्याची मागणी केली होती. दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यानंतर न्या. पी. व्ही. हरदास आणि न्या. अजय गडकरी यांच्या खंडपीठाने तपास सीबीआयकडे वर्ग करायचा की नाही याचा निर्णय राखून ठेवला होता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा