अभिनेता सुशांतसिंह राजपुतची एकेकाळची मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यूप्रकरणात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने म्हणजेच सीबीआयने अहवाल सादर केल्याच्या वृत्तावर नितेश राणेंनी प्रतिक्रिया नोंदवली आहे. दिशा सालियन प्रकरणाचा तपास कधी सीबीआयकडे नव्हताच तर ते या प्रकरणाचा अहवाल कसा सादर करणार असा सवाल नितेश यांनी विचारला आहे. नितेश यांनी एका वेबसाईटवरील बातमीचा हवाला देत सीबीआयच्या अधिकाऱ्याच्या वक्तव्यांचा संदर्भ दिला आहे.
“दिशा सालियानचा अपघाती मृत्यू झाल्याचं सीबीआयच्या अहवालात म्हटलं असल्याची बातमी सकाळ पासून दाखवली जात आहे. मात्र आता फ्री प्रेस जर्नलला बोलताना एका सीबीआय अधिकाऱ्याने स्पष्ट केलेलं आहे की दिशा सालियान प्रकरण सीबीआयकडे कधीच नव्हतं. सीबीआय या प्रकरणाचा तपास करतच नव्हतं. मग या प्रकरणाचा क्लोजर रिपोर्ट आम्ही कसा देणार अशी प्रतिक्रिया आम्ही कशी देणार? अशी प्रतिक्रिया नोंदवली आहे,” असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.
“दोन वर्षांपूर्वी उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल झाली होती. त्यावेळीही त्यांनी नकार दिला होता की हे प्रकरण सीबीआयकडे दिलं जाऊ शकत नाही. सीबीआयकडे हे प्रकरण नव्हतं तर ते अहवाल कसा देतील? दिवसभर खोट्या बातम्यांच्या माध्यमातून सगळीकडे वातावरण निर्मिती करण्यात आली आहे त्या सगळ्या गोष्टी खोट्या होत्या हे यावरुन सिद्ध होत आहे,” असं नितेश राणे म्हणाले आहेत.
सालियनच्या मृत्यूप्रकरणात भाजपा नेते आणि केंद्रीयमंत्री नारायण राणेंनी शिवसेना नेते आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले होते. दिशाचा सामूहिक बलात्कार करून खून केल्याचा आरोप राणेंनी केला होता. यासंदर्भात राणेंच्या दोन्ही मुलांनीही वेळोवेळी आदित्य यांचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष आरोप केले आहेत. सीबीआयच्या अहवालाची बातमी समोर आल्यानंतर उद्धव ठाकरे गटाकडून या विषयावरुन राणेंना लक्ष्य करण्यात आलं होतं.