CBI Raid Sameer Wankhede House : अंमली पदार्थ नियंत्रण विभागाचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्याशीसंबंधी मोठी बातमी समोर येत आहे. आर्थिक अन्वेषण विभागाने ( सीबीआय ) समीर वानखेडे यांच्या मुंबईतील घरावर छापेमारी केली आहे. तसेच, सीबीआयने भ्रष्टाचारप्रकरणी समीर वानखेडे यांच्याविरुद्ध गुन्हाही दाखल केला आहे. त्यामुळे समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान क्रूझ ड्रग्स प्रकरणी सीबीआयकडून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. सीबीआयकडून समीर वानखेडे यांच्याशी संलग्न असलेल्या मुंबई, दिल्ली, रांची, कानपूरसह २९ ठिकाणांवरील मालमत्तांवर धाडी टाकण्यात आल्या आहेत.
नेमकं प्रकरण काय?
२ ऑक्टोबर २०२१ रोजी एनसीबीने एका क्रूझवर धाड टाकली होती. ड्रग्जप्रकरणात केलेल्या या कारवाईत आर्यन खानसह २० जणांना अटक करण्यात आली होती. तेव्हा एनसीबी मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे होते. एनसीबीने आर्यन खानला जवळपास एक महिना कोठडीत ठेवलं होतं. पण, पुराव्याअभावी आर्यन खानची निर्दोष मुक्तता झाली होती.
त्यातच आर्यन खान प्रकरणातील एनसीबीचे पंच प्रभाकर साईल यांनी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. आर्यन खानला सोडण्यासाठी २५ कोटींची लाच मागण्यात आली होती. त्यातील आठ कोटी वानखेडे यांना देणार होतो, असं साईल यांनी सांगितलं होतं. त्याची गंभीर दखल घेत एनसीबीच्या दक्षता विभागामार्फत समीर वानखेडे यांची चौकशी करण्यात आली होती. त्याचप्रकरणात सीबीआयने ही छापेमारी केल्याचं सांगण्यात येत आहे.