मुंबई : बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने विमा कंपनीत कार्यरत दिनेश बोभाटे यांच्याविरोधात नुकताच गुन्हा दाखल केला आहे. बोभाटे हे ठाकरे गटाच्या एका कर्मचारी संघटनेत पदाधिकारी असून एका बड्या नेत्यांचे निकवर्तीय असल्याचे बोलले जाते. सीबीआयच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने नुकताच हा गुन्हा दाखल केला आहे. यात बोभाटे याच्यावर दोन कोटी ५८ लाखांची बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
हेही वाचा >>> अभिनेता पुष्कर जोग यांच्या वक्तव्यावरून पालिका कर्मचाऱ्यांमध्ये संताप, कारवाई करण्याची संघटनांची मागणी
सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार, दिनेश बोभाटे हे न्यु इंडिया इन्श्युरन्स कंपनी लिमि.च्या लोअर परळ येथील कार्यालयात वरीष्ठ सहायक पदावर कार्यरत असताना १ एप्रिल २०१४ ते ११ जुलै २०२३ या काळात त्यांनी गैरमार्गाने बेहिशेबी संपत्ती गोळा केली. बोभाटे यांनी एकूण ज्ञात उत्पन्नाच्या ३६.४३ टक्के अधिक म्हणजेच दोन कोटी ५८ लाख ६९ हजार ५७८ रुपये बेहिशेबी मालमत्ता स्वत:च्या आणि पत्नीच्या नावावर गोळा केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्यानुसार, भ्रष्ट्राचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांखाली सीबीआयने बोभाटे आणि त्यांच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.