बहुचर्चित शीना बोरा हत्या प्रकरणात केंद्रीय गुप्तचर विभागाने मंगळवारी इंद्राणी मुखर्जीसह तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास ‘सीबीआय’कडे सोपविल्यानंतर दहा दिवसांनी ही कारवाई करण्यात आली आहे. शीना बोरा या तरुणीची २३ एप्रिल २०१२ रोजी तिची आई इंद्राणीने हत्या करून तिचा मृतदेह रायगड जिल्ह्य़ातील पेणच्या जंगलात जाळला होता. तीन वर्षांनंतर हे प्रकरण खार पोलिसांनी उघडकीस आणले होते.
शीना बोरा प्रकरण केवळ हत्येचे नसून त्यात अनेक आर्थिक गोष्टींचा संबंध असल्याचा अहवाल राज्याच्या पोलीस महासंचालकांनी सादर केला होता. त्यामुळे हे प्रकरण केंद्रीय गुप्तचर विभागाकडे सुपूर्द करण्यात आले होते. ‘सीबीआय’ने या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष पथक स्थापन केले आहे.
हत्या, अपहरण, पुरावा नष्ट करणे आदी विविध कलमाअंतर्गत सीबीआयने इंद्राणीसह तिघांवर गुन्हे दाखल केले आहेत.