२०१२ मधील शीना बोरा हत्या प्रकरणात आरोपी असणाऱ्या इंद्राणी मुखर्जीने सीबीआयला पत्र लिहून शीना बोरा जिवंत असल्याचा दावा केला होता. कारागृहात आपली माजी पोलीस निरीक्षक आणि कैदी आशा कोरके नावाच्या महिलेसोबत भेट झाली असून त्यांनी काश्मीरमध्ये शीना बोराची भेट झाल्याचं सांगितलं होतं, असंही तिने पत्रात म्हटलं होतं. तसेच याच आधारे सीबीआयने काश्मीरमध्ये शीना बोराचा शोध घ्यावा, अशी मागणी इंद्राणी मुखर्जीने केली होती. दरम्यान, इंद्राणी मुखर्जीचा हा दावा सीबीआयने फेटाळून लावला आहे. सीबीआयने इंद्राणी मुखर्जीच्या याचिकेला विरोध करत उत्तर दाखल केले आणि ती खटल्याच्या सुनावणीस विलंब करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा दावा केला.

दरम्यान, इंद्राणी मुखर्जीने सीबीआयच्या उत्तराला उत्तर दिलंय. मुंबईतील न्यायालयात दिलेल्या उत्तरात इंद्राणी मुखर्जीने सांगितले की, “गेल्या दोन वर्षांत खटला चालवला गेला नाही आणि त्यात तिची कोणतीही भूमिका नाही. त्यामुळे मी मला मिळालेली माहिती कोर्टात कळवल्यानंतर माझा हेतू चुकीचा आहे, असा दावा करणे निंदनीय आहे.”

इंद्राणी मुखर्जीच्या वकील सना रईस खान यांनी सादर केलेल्या प्रतिवादात म्हटले आहे की, “महाराष्ट्र पोलीस सेवेत २५ वर्षे सेवा दिलेल्या आशा कोरकेच्या जबाबापेक्षा ड्रायव्हर श्याम रायच्या खोट्या कथेवर सीबीआयनं विश्वास ठेवत अवलंबून राहणं अत्यंत निंदनीय आहे. सीबीआयने पोलीस दलातील एका समर्पित अधिकाऱ्यापेक्षा एका खोटारड्या चालकावर अवलंबून राहणे हे दुर्दैवी आहे.” यासंदर्भात इंडिया टुडेने वृत्त दिलंय.

रेकॉर्डवरील वैद्यकीय आणि वैज्ञानिक पुरावे तिची केवळ निर्दोष मुक्तताच करत नाहीत तर तपास पथकाने केलेला चुकीचा तपास आणि हेराफेरी देखील उघड करतात, असा दावा इंद्राणी मुखर्जीने केलाय. तसेच तिला खोट्या प्रकरणात गोवण्यात आलं होतं, असा आरोपही तिने केलाय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सीबीआय आशा कोरकेची मुलाखत घेण्यास घाबरत आहे, कारण सीबीआयने केलेल्या दर्जाहीन आणि चुकीच्या तपासाचा पर्दाफाश होईल, अशी भीती त्यांना आहे, असा आरोप इंद्राणी मुखर्जीनं केलाय.