पश्चिम रेल्वेवर अनधिकृत तिकीट दलालांचा सुळसुळाट असल्याच्या तक्रारी रेल्वे सुरक्षा दलाकडे वारंवार करूनही कोणतीही कारवाई होत नसल्याने अखेर रेल्वे प्रवासी संघटनांनी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) धाव घेतली. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानेही ही तक्रार गांभीर्याने घेत मंगळवारी अंधेरी स्थानकात छापा टाकली. या छाप्यात आठ अनधिकृत तिकीट दलालांना ताब्यात घेण्यात आले.
अनधिकृत तिकीट दलालांना तिकीट नोंदणी कारकून आणि रेल्वे सुरक्षा दलातील जवान यांची साथ मिळत असल्याचे आढळून आल्यानंतर तीन तिकीट नोंदणी कारकुनांनाही सीबीआयने ताब्यात घेतले. पश्चिम रेल्वेही वारंवार अशा अनधिकृत तिकीट दलालांवर कारवाई करत असून येत्या वर्षभरात ८३ दलालांवर कारवाई करण्यात आली आहे.
अंधेरी येथील तिकीटगृहात अनधिकृत दलालांचा सुळसुळाट असतो, अशा तक्रारी अनेकदा करण्यात आल्या होत्या. लांब पल्ल्याच्या गाडय़ांचे तात्काळ आरक्षण करायला गेलेल्या प्रवाशांची नावे नेहमीच प्रतीक्षा यादीत येत. तसेच तात्काळ आरक्षण करण्यासाठी रांग लावण्यास वेळेआधी गेल्यास रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी हटकण्याचे प्रकार वारंवार घडत होते. अधिक तपास केला असता अनधिकृत तिकीट एजंट वेळेआधी तिकीट खिडकीजवळ जमत असल्याचे आढळले होते. या दलालांचे आणि कारकुनांचे साटेलोटे असावे, असा संशय घेण्यासारख्या गोष्टी घडत होत्या. या कारकुनांना ठरावीक पैसे दिल्यानंतर वेळेआधीच अनेकदा तिकीट आरक्षणांची तयारी केली जाते, असे लक्षात आले होते.
याबाबत रेल्वे सुरक्षा दलाकडे तक्रार करूनही त्याची कधीच दखल घेण्यात आली नाही. अखेर आरटीआय कार्यकर्ते अनिस खान यांनी हा घडत असलेला प्रकार सीबीआयकडे नोंदवला. सीबीआयनेही त्वरीत दखल घेत ६ नोव्हेंबरपासून या तिकीट घरावर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली.
या वेळी तक्रारींमध्ये तथ्य असल्याचे जाणवल्यानंतर सीबीआयने मंगळवारी सकाळी तात्काळ तिकिटांचे आरक्षण सुरू होण्याच्या वेळी
छापा मारला.
या छाप्यात सीबीआयने आठ अनधिकृत तिकीट दलालांना ताब्यात घेतले. तर तिकीट नोंदणी कारकूनांकडे जरूरीपेक्षा जास्त पैसे सापडल्यानंतर तीन कारकूनांनाही ताब्यात घेतले. आता या तिकीट घराच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रीकरणाचा तपास होत आहे. तसेच या प्रकरणी चौकशी चालू आहे. अंधेरीप्रमाणे इतर अनेक स्थानकांवरील तिकीट घरांमध्ये अनधिकृत तिकीट दलालांचा सुळसुळाट आहे. या ठिकाणीही सीबीआय छापे मारणार असल्याचे समजते.