वाडिया रुग्णालयातून एक दिवसाच्या बाळाच्या झालेल्या चोरीचा छडा लावण्यात भोईवाडा पोलिसांना अपयश आल्याने मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी या प्रकरणाच्या तपासाची सूत्रे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-४कडे सोपवली.
न्यायमूर्ती पी. व्ही. हरदास आणि न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणी सुनावणी झाली. त्या वेळी भोईवाडा पोलिसांनी आपण सर्वप्रकारे या प्रकरणाचा तपास करून आरोपीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतरही आरोपीचा छडा लागलेला नाही, असे सांगितले. त्यामुळे न्यायालयाने या प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वषेण विभागाच्या युनिट-४ कडे वर्ग केला.
बाळाची आई जास्मिन देवदास नाईक हिने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. २५ ऑक्टोबर २०१२ रोजी प्रसुतीनंतर जास्मीन बाळाला घेऊन वॉर्डमध्ये बसली असता तेजश्री नावाची महिला तिच्याजवळ आली. तिने स्वत:ला ती डॉक्टर असल्याचे सांगत जास्मीनला थोडे फिरून येण्यास सांगितले. सोबत आईलाही घेऊन जाण्यास सांगत तोपर्यंत बाळाची काळजी आपण घेऊ, असे तिने जास्मीनला आश्वासित केले.
डॉक्टरच्या हाती बाळाला सोपविल्याने जास्मीन तेथून आईसोबत निघून गेली. परंतु ती परतली तेव्हा ती महिला आणि बाळही पलंगावर नव्हते. जास्मीन आणि तिच्या आईने त्या महिलेचा आणि बाळाचा शोध घेतला. सगळ्यांकडे चौकशी केली. परंतु त्यांचा काहीच थांगपत्ता लागला नाही. अखेर जास्मीनने भोईवाडा पोलिसांत बाळचोरीची तक्रार केली आणि बाळ मिळेपर्यंत आपण रुग्णालयातूनही हलणार नाही, असा हट्ट तिने धरला. नंतर तिला घरी नेण्यात आले.
दीड वर्ष उलटून गेले तरी भोईवाडा पोलीस संबंधित महिलेचा आणि बाळाचा लावू शकले नाहीत म्हणून जास्मीनने उच्च न्यायालयात धाव घेत तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविण्याची मागणी केली होती.

Story img Loader