महापालिकेच्या स्थायी समितीचे नूतनीकरण करताना ‘सुरक्षे’च्या कारणासाठी बसवण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे, नगरसेवकांच्या विरोधामुळे काढण्याचा निर्णय घेण्यात आला. समितीत कोटय़ावधी रुपयांचे प्रस्ताव चर्चेला येतात, तसेच महत्त्वाचे निर्णय घेतले जातात, त्यामुळे हे कॅमेरा काढण्याची मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली होती.
गेले काही महिने स्थायी समिती सभागृहाचे नूतनीकरण सुरू होते. मागच्या आठवडय़ात त्याचे उद्घाटन करण्यात आले. या सभागृहाची पाहणी केल्यानंतर त्यात दोन सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात आल्याचे नगरसेवकांच्या लक्षात आले. या कॅमेरांना सर्वच नगरसेवकांनी विरोध केला. पालिकेचे आर्थिक सत्ताकेंद्र असलेल्या स्थायी समितीत चित्रिकरण होऊ नये अशी मागणी नगरसेवकांनी केली. कंत्राटदाराने इतर सामान्य कार्यालयांप्रमाणेच सुरक्षेच्या कारणासाठी हे कॅमेरा बसवले होते. त्यात कंत्राटदाराची चूक नसल्याचे समितीचे अध्यक्ष यशोधर फणसे यांनी सांगितले. मात्र, पालिकेच्या इतर कोणत्य़ाही सभागृहात कॅमेरा नाही, तसेच या समितीच्या बैठकीला पालिका अधिकारी, कर्मचारी, पत्रकार असतात, चर्चेची नोंद केली जाते. तेव्हा कॅमेरा ठेवण्याची गरज नाही, असे मत व्यक्त केल्याने हे सीसीटीव्ही कॅमेरे काढण्याचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी महापौर असताना दत्ता दळवी यांनी स्थायी समितीतील संभाषण ऐकण्यासाठी महापौर दालनात ध्वनिक्षेपक बसवला होता, त्यावरून वाद झाला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा