२ ऑक्टोबरपासून संपूर्ण शहरात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

येत्या २ ऑक्टोबरपासून, गांधी जयंतीदिनी मायानगरी मुंबईच्या कानाकोपऱ्यावर करडी नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे सज्ज होणार आहेत. मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्यानंतर हाती घेण्यात आलेली ही सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची योजना अखेर पूर्णत्वास आली असून सुमारे ९९६ कोटी रुपये खर्चून संपूर्ण शहरात ४६९३ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे निर्माण करण्यात आले आहे. हा प्रकल्प कार्यान्वित झाला, की जगाच्या नकाशावर मुंबई ‘स्मार्ट सिटी’बरोबरच ‘सेफ सिटी’ म्हणूनही ओळखली जाईल, अशी माहिती गृह विभागातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.

मुंबईवर झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर नेमण्यात आलेल्या राम प्रधान समितीने सीसीटीव्ही बसविण्याची शिफारस केली होती. केवळ पोलीस बळाच्या जोरावर मुंबईचे संरक्षण करता येणार नाही. मनुष्यबळ वाढविण्यास मर्यादा आहेत. त्यावर आधुनिक तंत्रज्ञान हा एकच पर्याय असल्याने सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे मुंबईतील गुन्हेगारी, दहशतवादी हल्ले रोखण्यास आणि गुन्ह्य़ांची उकल करण्यास मदत होईल. तसेच पोलीस दलात पारदर्शकता येईल, असा विचार करून तत्कालीन सरकारने शहरात सहा हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे निर्माण करण्याचा निर्णय घेतला. मात्र आघाडी सरकारच्या काळात तब्बल सात वर्षे मुंबई शहरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा प्रश्न सुटू शकला नाही. सत्तांतरानंतर भाजप-शिवसेना युती सरकारने या प्रकल्पास गती दिल्यानंतर नोव्हेंबर २०१५मध्ये या प्रकल्पांतर्गत दक्षिण मुंबईतील कुलाबा ते वरळीदरम्यान १२५० सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्याचा पहिला टप्पा पूर्ण झाला.

आता उर्वरित संपूर्ण शहरात म्हणजेच चेंबूरपासून मुलुंड आणि दहिसर पासून वरळी-दादरदरम्यान ३४४३  सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. त्यातील ५०० कॅमेरे हे फिरते असून केव्हाही कोणत्याही दिशेला नियंत्रण कक्षातून वळविता येणार आहेत. हे सर्व कॅमेरे कार्यान्वित झाल्यानंतर शहरात प्रवेश करणाऱ्या तसेच शहरातील रस्त्यांवरून फिरणाऱ्या वाहनांचे नंबर डिटेक्शन, व्हिडीओ अ‍ॅनालिटिकल करण्यास तसेच संवेदनशील व महत्त्वाच्या ठिकाणांची सुरक्षाव्यवस्था अधिक मजबूत करण्यात मदत होणार आहे. त्यासाठी तीन ठिकाणी नियंत्रण कक्ष निर्माण करण्यात आले असून तेथून संपूर्ण शहरावर नजर ठेवली जाणार आहे.

त्याचबरोबर रेल्वे, मुंबई पोर्ट, विमानतळ, शेअर बाजार, मॉल, हाजी अली, मुंबादेवी, सिद्धिविनायक मंदिर तसेच हॉटेल्स, मोठय़ा गृहनिर्माण वसाहती अशा १०३ संस्थांनाही या प्रकल्पात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले असून ते सहभागी झाल्यास तेथील सुरक्षाव्यवस्थेवरही पोलिसांना लक्ष ठेवण्यास मदत होणार असल्याची माहिती गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव के. पी. बक्षी यांनी दिली.

’ पुणे- मुंबईबरोबरच आता औरंगाबाद, नांदेड, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, नाशिक, सोलापूर या शहरांचेही सीसीटीव्ही प्रकल्प मंजूर झाले असून तेथेही कामे सुरू झाली आहेत. ठाण्याचा मात्र अजून प्रस्तावच आलेला नसल्याचेही सूत्रांनी सांगितले. c

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cctv camera in mumbai