सीसीटीव्हींसह ‘टॉकबॅक’, ‘पॅनिक बटण’ यंत्रणा उभारणार; ३०० कोटींच्या प्रस्तावांना अर्थसंकल्पात मंजुरी
मुंबई उपनगरीय रेल्वेगाडय़ांमधील गुन्हेगारीच्या घटना तसेच गैरकृत्ये यांना आळा घालण्यासाठी लोकलच्या सर्व डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या प्रस्तावांना केंद्रीय अर्थसंकल्पातून मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार २४२ लोकलच्या सर्व डब्यांत सीसीटीव्हींबरोबरच टॉक बॅक आणि पॅनिक बटन यांसारखी यंत्रणाही बसविण्यात येणार आहे. यासाठी ३०० कोटी रुपयांहून अधिक खर्च अपेक्षित आहे.
एल्फिन्स्टन रोड स्थानकातील पादचारी पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरील सोयीसुविधांचा आढावा घेतला होता. या आढाव्यात नवीन पादचारी पूल, सरकते जिने अशा सोयीसुविधांबरोबरच प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सर्व लोकलच्या डब्यात सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेतला होता. सीसीटीव्ही बसवितानाच त्यासोबतच आपत्कालीन परिस्थितीत गार्ड आणि मोटरमनशी संवाद साधता यासाठी ‘टॉक बॅक’ तर गार्डला सतर्क करता यावे यासाठी ‘पॅनिक बटन’चाही प्रस्ताव पश्चिम, मध्य रेल्वेकडून तयार करण्यात आला. प्रस्तावानुसार मध्य रेल्वेवरील १४२ आणि पश्चिम रेल्वेवरील १०० लोकल गाडय़ांत ही यंत्रणा बसविली जाईल. मध्य रेल्वेला यासाठी १७७ कोटी रुपये, तर पश्चिम रेल्वेला १२३ कोटी रुपये खर्च येणार आहे. हे दोन्ही प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले होते. त्याला अर्थसंकल्पातून मंजुरी मिळाली आहे.
पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार गुप्ता यांनी सीसीटीव्हींसह अन्य सुरक्षा यंत्रणा बसविण्याला रेल्वे अर्थसंकल्पातून मंजुरी मिळाल्याचे सांगितले. आता या यंत्रणेची प्रत्यक्षात अंमलबजावणी कशी करता येईल याबाबतचे रेल्वे बोर्डाकडूनही सूचना प्राप्त होताच काम सुरू केले जाणार आहे. मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक एस.के. जैन यांनी सीसीटीव्हीसह लोकलच्या डब्यात बसविण्याला मंजुरी मिळाल्याचे सांगितले.
कुठे, काय?
- मध्य रेल्वे मार्गावरील लोकलच्या डब्यात आठ हजारपेक्षा जास्त सीसीटीव्ही आणि १,१०६ ‘टॉक बॅक’ यंत्रणा बसविण्यात येईल.
- पश्चिम रेल्वेवरील सर्व लोकलच्या डब्यांत जवळपास पाच हजार सीसीटीव्ही आणि ५०० पेक्षा जास्त टॉक बॅक यंत्रणा आणि पॅनिक बटन असेल.
- टॉक बॅकसाठी १२ कोटी आणि सीसीटीव्हीसाठी १११ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
‘पॅनिक बटण’चा ताप
महिला प्रवाशांना आपत्कालीन प्रसंगी लोकलच्या गार्ड वा मोटरमनशी थेट संपर्क साधता यावा, यासाठी मध्य रेल्वेच्या एका लोकलच्या महिला डब्यात प्रायोगिक तत्त्वावर ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. मात्र, या यंत्रणेचा विनाकारण वापर होत असल्याचे उघड झाल्यानंतर ती तात्पुरती गुंडाळण्यात आली होती.
थेट देखरेख नाही!
सध्या पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या काही प्रत्येकी दहापेक्षा जास्त लोकलच्या महिला डब्यांत सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत; परंतु या सीसीटीव्हींद्वारे मिळणाऱ्या दृश्यांवर थेट देखरेख ठेवण्यात येत नाही. थेट देखरेखीला महिला प्रवाशांनी विरोध केल्याने आता लोकल कारशेडमध्ये गेल्यानंतर कॅमेऱ्यातील चित्रीकरणाचा आढावा घेण्यात येतो. यापुढेही सर्व लोकल डब्यांत सीसीटीव्ही बसवण्यात येताच ती यंत्रणा नेमकी कशी हाताळणार याबाबत स्पष्ट केले नसले तरी सीसीटीव्हींद्वारे थेट देखरेख करणे अशक्य असल्याचे सांगितले जात आहे.