उपनगरी रेल्वेमार्गावर प्रवासादरम्यान निर्माण होणारे महिला सुरक्षेचे प्रश्न दूर करण्यासाठी आता येत्या दोन महिन्यांत प्रत्येक उपनगरीय गाडीच्या प्रत्येक महिला डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार असल्याची ग्वाही रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिली. अशा प्रकारे २० हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी निर्भया निधीतून पैसे खर्च केले जाणार आहेत. मुंबई भाजप अध्यक्ष अ‍ॅड. आशीष शेलार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाशी चर्चेदरम्यान रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी ही ग्वाही दिली.मुंबईतील उपनगरीय रेल्वे प्रवास दिवसेंदिवस महिलांसाठी असुरक्षित ठरत असल्याचे समोर येत आहे. पंधरा दिवसांपूर्वी चर्नीरोड आणि मरिन लाइन्स या स्थानकांदरम्यान महिलांच्या डब्यात शिरलेल्या एका गर्दुल्ल्याने एका तरुणीचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला होता.