सामाजिक कार्यकर्ते प्रदीप इंदुलकर यांना मारहाण झाल्याचा मोठा पुरावा म्हणून ज्याकडे पाहीले जात होते ते नौपाडा पोलीस ठाण्यातील सीसी टीव्ही कॅमेरे वर्षभरापासून बंद असल्याचा शोध ठाण्याचे पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांनी लावला आहे. या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील चित्रणाच्या आधारे नेमका प्रकार उघडकीस आला असता. मात्र, हे सीसीटीव्ही कॅमेरे वर्षभरापासून बंद असल्याने त्याचा उपयोग पुरावा म्हणून करता येणार नाही, असे स्पष्टीकरण चौकशी अधिकाऱ्यांनी इंदुलकर यांना दिले आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांचा निषेध नोंदविण्यासाठी सहा सप्टेंबरपासून इंदुलकर यांच्यासह शहरातील सामाजिक कार्यकर्ते उपोषणाला बसणार आहेत, अशी माहिती ठाण्यातील वेगवेगळ्या सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींना बुधवारी पत्रकारांना दिली.
दहिहंडी उत्सवातील दणदणाटाविषयी तक्रारी करण्यासाठी पोलिसांकडे सातत्याने पाठपुरावा करणारे प्रदीप इंदुलकर यांना गेल्या शुक्रवारी नौपाडा पोलीस ठाण्यात मारहाणीचा प्रकार घडला.
 या पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक (गुन्हे) आर.एस.शिरतोडे यांनी इंदुलकर यांना बेदम मारहाण केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. सामाजिक चळवळींसाठी नेहमीच अग्रणी राहीलेल्या ठाण्यासारख्या शहरात एका समाजिक कार्यकर्त्यांला पोलिसांकडून मारहाण झाल्यामुळे शहरातील वेगवेगळ्या सामाजिक संघटना त्याविरोधात एकवटल्या आहेत. याप्रकरणी पोलीस आयुक्त के.पी.रघुवंशी यांनी उपायुक्त अशोक दुधे यांच्याकडे याप्रकरणाची चौकशी सोपवली असून इंदुलकर यांना झालेल्या मारहाणीला तब्बल पाच दिवस उलटूनही दुधे यांची चौकशी संपलेली नाही. नौपाडा पोलीस ठाण्यातील सीसीटीव्हीचे चित्रण तपासावे अशी आग्रही मागणी इंदुलकरांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलिसांकडे केली होती. सीसी टीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रण पाहील्यास त्यावरुन आपणास किती अमानुषपणे मारहाण झाली हे स्पष्ट होईल, असा इंदुलकर यांचा दावा होता.
मात्र, हे कॅमेरे गेले वर्षभर बंद आहेत, असा खुलासा उपायुक्त दुधे यांनी केल्यामुळे याप्रकरणातला मोठा पुरावा उपयोगात आणता आलेला नाही. दरम्यान, पोलिसांची चौकशी अतिशय मंदगतीने सुरु असल्याची तक्रार बुधवारी येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी केली. इंदुलकर यांना मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबीत केले जावे, अशी मागणी या कार्यकर्त्यांनी केली.