आखाती देशात काम करणाऱ्या रेनॉल्ड डिसोजाची त्याच्याच घरात झालेल्या हत्येने पोलीस चक्रावले. संशयाची सुई अनेकांवर वळत होती. रेनॉल्डची हत्या अतिशय विचारपूर्वक आणि नियोजनबद्धरीत्या करण्यात आली होती. पोलिसांनी तपासाची दिशा बदलली. जे सत्य समोर आले ते केवळ चक्रावून टाकणारे नव्हते तर ढासळलेली नीतिमत्ता कुठल्या स्तराला जाऊ शकते त्याचे जळजळीत वास्तव होते. तिसरा डोळा अर्थात सीसीटीव्ही कॅमेऱ्याने टिपलेल्या एका दृश्याच्या आधारे तर्क लावून पोलिांसांनी छडा लावला.

९ डिसेंबर २०१५. रात्रीचे दहा वाजले होते. ५२ वर्षीय सिसिलिया डिसोजा संध्याकाळचा फेरफटका मारून पै मेन्शनमधील आपल्या घरी होती. मालाडच्या लिंकिंग रोडवरील एव्हरशाईन नगरात ही इमारत होती. आज तिला जास्तच वेळ लागला होता. ती पै मेन्शन इमारतीच्या गेटवर आली. गेट उघडाच होता. तिचा मुलगा रेनॉल्ड (३२) आखाती देशातून परतला होता. वर्षांतून तो दोन-तीन वेळा आपल्या घरी यायचा. सिसिलिया घरात गेली. दार उघडेच होते. दार उघडे कसे या विचाराने तिने घरात प्रवेश केला. आतील दृश्य पाहून ती जागीच खिळली. तिचा ३२ वर्षीय मुलगा रेनॉल्ड रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. घरातील सामान अस्ताव्यस्त होते. सिसिलिया किंचाळली. तिने शेजाऱ्यांना माहिती दिली. तिला या घटनेचा धक्का बसला. बांगूरनगर पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी हजर झाले. रेनॉल्ड डिसोजा तरुणाची कुणीतरी तीक्ष्ण हत्याराने गळ्यावर आणि छातीवर वार करून हत्या केली होती.
घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी पंचनामा सुरू केला. रेनॉल्डची हत्या का आणि कुणी केली हा प्रश्न होता. रेनॉल्ड आखाती देशातून दोन महिन्यांतून एक दा आईला भेटायला यायचा. तेवढेच काय त्याचे मुंबईतले वास्तव्य. कुणाशी वाद नाही, वैर नाही. मित्र सोडल्यास कुणाशी मिसळत नव्हता. मग त्याच्या हत्येचे कारण काय? पोलीस चक्रावले होते. परिमंडळ ११ चे पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम देशमाने यांनी स्वत: या संवेदनशील प्रकरणाच्या तपासात लक्ष घातले. पोलिसांना रेनॉल्डचा मारेकरी शोधण्याचे आव्हान होते.
पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. घरात जबरदस्तीने कुणी प्रवेश केला नव्हता. याचाच अर्थ मारेकरी ओळखीचे असण्याची शक्यता होती. पै मेन्शन या इमारतीत सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते. कुणी इमारतीत आले ते समजत नव्हते. सुरक्षा रक्षकाकडे चौकशी केली, पण इमारतीत कोण कोण आले याच्या नोंदी ठेवण्यात आलेल्या नव्हत्या. घरातले सामान अस्ताव्यस्त होते खरे पण मौल्यवान वस्तूंची चोरी झालेली नव्हती. रेनॉल्डच्या गळ्यातील सोनसाखळी आणि त्याचा मोबाइल मारेकऱ्यांनी नेलेला होता. पोलीस निरीक्षक दीपक फटांगरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी निष्कर्ष काढला. चोरी हा उद्देश नक्कीच नाही. चोरीच्या उद्देशाने हत्या केली हे दाखवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. कारण चोरी करायची असती तर घरातील कपाटात ठेवलेले पैसे, इतर किमती ऐवज नक्कीच लंपास केला गेला असता. पोलिसांनी तर्क लावून पहिला निष्कर्ष काढला की रेनॉल्डची हत्या ही वैयक्तिक कारणावरून झालेली असावी.
पोलिसांनी इमारतीत येणाऱ्या सर्वाचे जबाब नोंदविले. रेनॉल्डची आई सिसिलिया रडून रडून बेजार झाली होती. रेनॉल्डची बहीण जेन्सी हवाई सुंदरी होती. ती सतत बाहेर असायची. गेल्या वर्षीच रेनॉल्डच्या वडिलांचे निधन झालेले होते. रेनॉल्ड आखाती देशात तेलाच्या कंपनीत कामाला होता. तीन वर्षांपूर्वी त्याचे लग्न झालेले होते. पण तो पत्नीपासून वेगळा राहात होता. घटस्फोटासंदर्भात त्याचे प्रकरण वांद्रेच्या कौटुंबिक न्यायालयात सुरू होते. घरची सांपत्तिक स्थिती उत्तम होती. रेनॉल्डला गलेलठ्ठ पगार होता. ५२ वर्षीय सिसिलिया यांनी वाहनचालक ठेवला होता. त्याच्याकडेही पोलिसांनी चौकशी केली. रेनॉल्डचे कुणाशी वैर होते का, त्याने रिअल इस्टेटमध्ये केलेल्या काही आर्थिक व्यवहारांमध्ये कुणाशी वाद होता का, त्याचे कुणाशी प्रेमसंबंध होते का आदी सर्व दृष्टिकोनातून पोलिसांनी तपास चालू केला. पण यश काही येत नव्हते. त्यामुळे हे प्रकरण क्लिष्ट बनत चालले होते.
पोलीस विविध दृष्टीने तपास करत होते. फटांगरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी इमारतीच्या आसपासचे सीसीटीव्ही गोळा करायला सुरुवात केली. कारण रेनॉल्डची हत्या ही कॉन्ट्रॅक्ट किलिंगचा भाग असावा हे स्पष्ट झाले होते. एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये पोलिसांना एका इमारतीजवळ सिसिलिया दिसली. ती एका इसमाला काहीतरी वस्तू देत होती. पोलिसांना धक्का बसला. कारण ती व्यक्ती म्हणजे डिसोजा यांच्याकडे काम करणारा वाहन चालक भरत नेपाळी (२५) होता. भरतला सिसिलिया काय देत असावी आणि काही द्यायचे असेल तर आपल्या इमारतीजवळ का काही दिले नाही. पोलिसांचा संशय बळावला आणि तपासाची दिशा बदलली. पोलिसांना मग भरत नेपाळीवर पाळत ठेवली आणि सिसिलियालाच चौकशीसाठी बोलावले. पोलिसांनी तिच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. सुरुवातीला ती काहीच दाद देत नव्हती. पण भरत नेपाळीला काय वस्तू दिली हे विचारले, असे विचारताच ती अडखळली. पोलिसांनी तिचा अडखळलेपणा बरोबर पकडला आणि तिला बोलते केले.
भरत नेपाळी आणि त्याचा साथीदार दीपक नेपाळी या दोघांना तिने स्वत:च्याच मुलाच्या हत्येची सुपारी दिली होती. हत्येचे कारण अधिकच धक्कादायक होते. २५ वर्षीय भरत बरोबर सिसिलियाचे अनैतिक संबंध होते. या संबंधांबाबत रेनॉल्डला समजले होते आणि तो आईला विरोध करत होता. पण शरीरसुखासाठी चटावलेल्या सिसिलिया जुमानत नव्हती. तिला भरत त्यासाठी तिने मुलाचाच काटा काढायचे ठरवले सुपारी दिली .

अनैतिक संबंधातून झाली हत्या
सुटीसाठी रेनॉल्ड मुंबईला घरी आला. त्याला आई आणि वाहनचालकाच्या संबंधांची कुणकुण लागली. या मुद्दय़ावरून तो आईशी भांडला होता आणि ताबडतोब हे संबंध थांबविण्यास बजावले होते. तेव्हाच सिसिलियाने भरतला सांगून हत्येचा कट रचला. हत्येच्या आधी तिने दोन दिवसांपूर्वी आपल्या घराची चावी भरतला देऊन ठेवली होती. ठरलेल्या योजनेप्रमाणे भरत आणि त्याचा साथीदार घरात दबा धरून बसणार होते. रेनॉल्ड घरी येताच त्याची हत्या करायची होती. यापूर्वी त्यांनी दोनदा प्रयत्न केला होता. पण त्या वेळेस रेनॉल्ड घरी आला नव्हता. हत्या झाल्यावर पोलीस मोबाइलचे रेकॉर्ड तपासणार हे माहीत असल्याने तिने मुद्दाम भरत आणि त्याच्या साथीदारास दुसरा फोन आणि सीमकार्ड दिले होते. ते देत असतानाचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. तिसऱ्या डोळ्याने टिपलेल्या या दृश्याने पोलिसांचा संशय बळावला आणि सिसिलीया पकडली गेली. पोलिसांनी भरत आणि त्याच्या साथीदारास नंतर अटक केली. भरत दीड वर्षांपूर्वी सिसिलियाच्या संपर्कात आला होता. तेव्हापासून अनैतिक संबंध सुरू झाले होते. सिसिलिया भरतला पैसे द्यायची. त्याला गाडीदेखील घेऊन दिली होती. दोन दिवसांत पोलिसांनी या हत्येचा छडा लावला होता.

Story img Loader