समिती स्थापन करू ’
सुरक्षेच्या दुष्टीकोनातून उपनगरीय रेल्वे गाडय़ांच्या महिलांच्या डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याबाबत व्यवहार्यता तपासण्याकरता एक अभ्यास समिती स्थापन करून अहवाल सादर करू, असे रेल्वेच्या वतीने उच्च न्यायालयात सांगण्यात आले. न्यायमूर्ती नरेश पाटील यांच्या खंडपीठासमोर रेल्वेच्या वकीलांकडून सांगण्यात आले. याबाबत पुढील सुनावणी ८ फेब्रुवारीला होणार आहे.
लोकलमधील महिलांच्या सुरक्षेबाबत दाखल विविध याचिकांवर न्यायमूर्ती नरेश पाटील खंडपीठासमोर सुनावणी झाली. एका याचिकाकर्त्यांने ज्येष्ठ नागरिकांसाठी एक स्वतंत्र डबा असावा यासाठी न्यायालयाला पत्र लिहिले होते. या पत्राचे रुपातंर याचिकेत करण्यात आले होते. यानंतर रेल्वे स्थानके, अस्वच्छता, फलाटांची उंची आणि लोकलमधील महिलांची सुरक्षा त्यांच्यासाठीच्या सुविधेबाबत एका स्वयंसेवी संस्थेने केलेला पाहणी अहवाल न्यायालयात सादर केला होता. या अहवालात काही रेल्वे स्थानकांवर महिलांसाठी शौचालये नसल्याची आणि असलीच तर त्याची अवस्था फार भयावह असल्याचे म्हटले होते. या सगळ्याची न्यायालयाने गंभीर दखल घेतली.
तोतया तिकीट निरीक्षकाला चर्चगेट स्थानकात अटक
मुंबई : तिकीट निरीक्षकाचे बनावट ओळखपत्र जवळ बाळगून विनातिकीट प्रवास करणाऱ्या एका तरुणाला बुधवारी चर्चगेट स्थानकात पकडण्यात आले. प्रवीण होगाडे (२७) असे त्याचे नाव आहे. त्याने आपले ओळखपत्र नेमके एका खऱ्याखुऱ्या तिकीट निरीक्षकाला दाखवले. हे ओळखपत्र बनावट असल्याचे संबंधित तिकीट निरीक्षकास आढळल्यावर त्याला लोहमार्ग पोलिसांच्या मदतीने पकडण्यात आले. या तरुणाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.