महिला प्रवाशांवर हल्ले होण्याच्या घटना वाढल्यानंतर या घटनांना आळा घालण्यासाठी आणि अशा घटना घडल्यास गुन्हेगारांचा माग काढण्यासाठी महिलांच्या डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेली पहिली लोकल गाडी शुक्रवारी पश्चिम रेल्वेवर धावली. या गाडीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे प्रवासादरम्यानच्या आमच्या खासगी वेळेवर आता गदा येणार असल्याची भावना अनेक महिला प्रवाशांनी व्यक्त केली असली, तरी असा कोणताही प्रकार घडणार नाही, याची ग्वाही खुद्द पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक ब्रिगेडिअर सुनीलकुमार सूद यांनी दिली. या कॅमेऱ्यांमधील चित्रीकरणावर देखरेख ठेवली जाणार नसून हे चित्रीकरण केवळ गुन्हा घडल्यानंतरच पोलिसांकडून पडताळले जाईल, असे ते म्हणाले.
रेल्वे प्रवासी-ग्राहक सुरक्षा पंधरवडय़ाचे औचित्य साधून पश्चिम रेल्वेने शुक्रवारी सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेली पहिलीवहिली लोकल गाडी प्रवाशांच्या सेवेत आणली. या गाडीतील महिलांच्या डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. याआधी मध्य रेल्वेवरील गाडय़ांच्या महिला डब्यांतही कॅमेरे बसवण्याची योजना होती. मात्र तेथील महिला प्रवासी संघटनांनी ‘प्रायव्हसी’चा मुद्दा काढून या योजनेला विरोध केल्याने ही योजना पश्चिम रेल्वेवर सुरू करण्यात आल्याचे ब्रिगेडिअर सूद यांनी सांगितले. मात्र प्रत्यक्षात या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील चित्रीकरणावर दर दिवशी देखरेख ठेवली जाणार नाही. या कॅमेऱ्यात ३० दिवसांचे चित्रीकरण सुखरूप राहील, अशी सोय करण्यात आली आहे. त्यानंतर तो डाटा पुसला जाऊन त्यावर पुन्हा पुढील ३० दिवसांचे चित्रीकरण होईल. हे चित्रीकरण कोणीच बघणार नसल्याचे ब्रिगेडिअर सूद यांनी स्पष्ट केले.
महिलांच्या बाबत एखादा गुन्हा घडल्यास त्या गुन्ह्य़ाचा तपास करून गुन्हेगारापर्यंत पोहोचण्यासाठी या कॅमेऱ्यातील चित्रीकरणाचा वापर होईल. हे चित्रीकरण रेल्वे सुरक्षा दलाच्या ताब्यात असले, तरी ते केवळ गुन्ह्य़ाच्या तपासासाठीच बघितले जाईल. त्यामुळे महिलांच्या ‘खासगी वेळे’ला कोणताही धक्का पोहोचणार नसल्याचे ब्रिगेडिअर सूद यांनी सांगितले. पश्चिम रेल्वेवर शुक्रवारी प्रायोगिक तत्त्वावर चाललेल्या या गाडीनंतर आणखी दोन गाडय़ांतील महिलांच्या डब्यांत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. त्यानंतर आणखी ८० गाडय़ांमधील महिला डब्यांत टप्प्याटप्प्याने कॅमेरे बसवले जातील. पश्चिम रेल्वेपाठोपाठ आता मध्य रेल्वेच्या प्रवाशांनी मागणी केल्यास मध्य रेल्वेवरही महिलांच्या डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येतील, असेही ब्रिगेडिअर सूद यांनी स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा