महिलांच्या डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे असलेली पहिली लोकल शुक्रवारी पश्चिम रेल्वेवर धावणार आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी रेल्वेने साकारलेल्या या योजनेचा शुभारंभ होणार आहे. एकूण तीन लोकल मध्ये प्रायोगिक तत्वावर हे सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत.
 लोकल ट्रेनमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही लावण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला होता. पश्चिम रेल्वेच्या कार्यशाळेत सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याची चाचणी यशस्वी झाल्यानंतर प्रायोगिक तत्वावर तीन लोकल मध्ये ४ ते ८ सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. शुक्रवारी या लोकल पहिल्यांदा धावणार आहेत. रेल्वे प्रवासी पंधरवडय़ाचे औचित्य साधून पश्चिम रेल्वेचे प्रभारी व्यवस्थापक सुनिलकुमार सूद यांच्याहस्ते त्याचे उद्घाटन केले जाणार आहे.
 १०० किलोमीटर प्रतिताशी वेगातही हा कॅमेरा अचूक दृश्य टिपू शकतो. या कॅमेऱ्याला कसा प्रतिसाद मिळतो ते पाहून अन्या लोकलमध्येही तो बसविण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.  दरम्यान, रेल्वेच्या सर्वसमावेशक सुरक्षा व्यवस्था योजनेअंतर्गत कल्याण आणि लोकमान्य टिळक टर्मिनसमध्ये १०० सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत. लोकमान्य टिळक टर्मिनसमध्ये यापूर्वी ४० कॅमेरे होते. आता त्यात नवीन १०० कॅमेऱ्यांची भर पडणार आहे. उच्च क्षमतेचे हे कॅमेरे रेल्वेच्या मालकीचे असणार असून महिन्याभरात ते बसवले जाणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे विभागीय सुरक्षा आयुक्त आशिष बोहरा यांनी दिली.

Story img Loader