‘बुरा ना मानो होली है’ असे म्हणत होळीच्या दुसऱ्या दिवशी धुळवड साजरी केली जाते. धुळवड खेळण्याच्या धुंदीत पुढचा-मागचा विचार न करता घातक रासायनिक रंगांनी सर्रास खेळले जाते. पण सावधान, या घातक रासायनिक रंगांचे दुष्परिणाम पाहायला मिळत असून धुळवड खेळायचीच असेल तर ती नैसर्गिक रंगाने खेळली जावी, असा विचार हळूहळू जोर धरू लागला आहे. धुळवड हा रंगांचा उत्सव असला तरी त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या घातक रासायनिक रंगांमुळे त्वचेचे विकार, घसा, डोळे यांना होणारी गंभीर इजा होऊ शकते. त्यामुळे आता रासायनिक रंग टाळून नैसर्गिक रंग वापरण्यावर अधिक भर देण्यात येत आहे. पर्यावरणप्रेमी, तज्ज्ञ आणि डॉक्टर मंडळींचेही तेच मत आहे.
घातक रासायनिक रंगांमुळे गंभीर इजा
पाण्याने/रंगाने भरलेले फुगे, प्लास्टिकच्या छोटय़ा पिशव्या फेकून मारणे हा अनेकांचा असतो. पण त्यामुळे अनेकांना शारीरिक जखमेबरोबरच मानसिक धक्काही बसतो. आणि म्हणूनच रंगाचा बेरंग होणार नाही, त्याची काळजी घेऊन धुळवड साजरी करावी, असे आवाहन घरातील ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती तयार करण्याचा प्रचार करणाऱ्या आणि त्यासाठी ठिकठिकाणी कार्यशाळा घेणाऱ्या पर्यावरणप्रेमी अनघा जोशी-सहस्त्रबुद्धे यांनी केले.