मुंबई : महाराष्ट्र सरकारने गुरुवारी होळीसाठी मार्गदर्शक तत्त्वे प्रसिद्ध केली. नागरिकांनी मोठय़ा प्रमाणात एकत्र न येता रंगांचा सण साजरा करावा. तसेच करोना अजूनही पूर्णपणे गेलेला नाही हे लक्षात ठेवून दिशानिर्देशांचे पालन करावे, असे आवाहन सरकारने केले आहे.
१८ ला धुळवड तर २२ मार्चला रंगपंचमी साजरी केली जाईल. होळी/शिमगा हा सण संपूर्ण महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणावर साजरा केला जातो. हा सण शक्यतो गर्दी न करता आणि कोविड योग्य वर्तनाचे पालन करून साजरा करावा, असे राज्याच्या गृह विभागाने एका प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. करोनाचा संसर्ग पसरू नये यासाठी धुळवड आणि रंगपंचमी साध्या पद्धतीने साजरी करावी, असे सरकारने म्हटले आहे. स्थानिक प्रशासनाने देखील कोविडयोग्य वर्तनाचे प्रभावी पालन सुनिश्चित करावे. गेल्या दोन वर्षांपासून साथीच्या आजाराच्या पाश्र्वभूमीवर राज्यातील सर्व सण उत्सव कमीअधिक प्रमाणात साजरे केले जात आहेत. अलीकडे महाराष्ट्रात करोना प्रादुर्भावाचा वेग मंदावला आहे. अधिकृत आकडेवारीनुसार बुधवारी २३७ नवीन संक्रमित आणि दोन मृत्यूची नोंद झाली.