माटुंगा (पश्चिम) येथील षण्मुखानंद सभागृहात शनिवारी लग्नसोहळ्याची लगबग सुरू होती. हा लग्नसहोळाही विशेष होता. वयाची साठी ओलांडलेल्या सहाशे जोडप्यांचा त्यांच्या निकटच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत पूर्वीच्याच उत्साहात पुन्हा एकदा लग्नसोहळा पार पडला. सनईच्या मंगल स्वरात साजऱ्या झालेल्या या अनोख्या सोहोळ्यात ‘त्या’ साठ जोडप्यांचे निकटचे नातेवाईक आणि १२० पुरोहित उपस्थित होते.
निमित्त होते श्री षण्मुखानंद कला आणि संगीत सभेला साठ वर्षे पूर्ण झाल्याचे. षण्मुखानंद सभागृहाच्या साठाव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने शनिवारी हा अनोखा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पुरुष मंडळी धोतर नेसून पारंपरिक वेषात होती. या प्रसंगी ‘ग्रॅण्डमाज् मेडिकल प्रिस्क्रिप्शन’ अर्थात आजीबाईचा बटवा आणि स्वामी तेजोमायनंद लिखित ‘ग्रेसफूल एजिंग’ या दोन पुस्तकांचेही प्रकाशन करण्यात आले.
साठी ओलांडलेली सहाशे जोडपी पुन्हा एकदा नव्या उत्साहात आणि आनंदात या सोहोळ्यात सहभागी झाली होती. काही जोडपी तर ८० ते ९० या वयोगटातीलही होती. ज्येष्ठ सदस्य षष्ठय़ब्दीपूर्ती समारंभ असे या सोहोळ्याचे स्वरूप होते. सुरुवातीला सर्व जोडप्यांनी सामुदायिक संकल्प केला. त्यानंतर गणपती व धन्वंतरी पुजन, महामृत्युंजय जप आणि होमहवन करण्यात आले. वैदिक मंत्राच्या घोषात साठी ओलांडलेल्या या सर्व जोडप्यांचे पुन्हा एकदा शुभमंगल झाले. परंपरेप्रमाणे पत्नीच्या गळ्यात मंगळसूत्र घालण्याचा विधिही पार पडला. कार्यक्रमात ज्या दोन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले, त्याच्या प्रती सहभागी झालेल्या सर्व जोडप्यां भेट म्हणून देण्यात आल्या. या वेळी साठ केक कापण्याचा कार्यक्रमही झाला. ‘ज्येष्ठांची काळजी’ या विषयावरील एक नाटिकाही या वेळी सादर करण्यात आली.
षण्मुखानंदच्या ६० व्या वर्धापन दिनी पुन्हा जुळल्या ‘ऋणानुबंधांच्या गाठी’!
माटुंगा (पश्चिम) येथील षण्मुखानंद सभागृहात शनिवारी लग्नसोहळ्याची लगबग सुरू होती. हा लग्नसहोळाही विशेष होता. वयाची साठी ओलांडलेल्या सहाशे जोडप्यांचा त्यांच्या निकटच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत पूर्वीच्याच उत्साहात पुन्हा एकदा लग्नसोहळा पार पडला.
First published on: 03-02-2013 at 03:05 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Celebration of 60th anniversary of shanmukhanand hall