मुंबई : मुंबईतील विविध मतदान केंद्रावर बुधवारी सकाळपासूनच सर्वसामान्य नागरिकांसह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि कलाकारांनी हजेरी लावत मतदानाचा हक्क बजावला आहे. मुंबईतील दादर – माहीम विधानसभा मतदारसंघातील तिरंगी लढतीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या मतदारसंघातील दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कातील बालमोहन विद्या मंदिर या शाळेतील मतदान केंद्रावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे, उमेदवार अमित ठाकरे, मिताली ठाकरे, शर्मिला ठाकरे, मधुवंती ठाकरे, गायक आणि संगीतकार अनुप जलोटा, ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते व सुकन्या मोने, ज्येष्ठ नाट्यनिर्मात्या लता नार्वेकर आदी कलाकारांनी मतदान केले. तसेच दादर – माहीम विधानसभा मतदारसंघासाठी अभिनेत्री निर्मिती सावंत यांनी कुटुंबियांसह प्रभादेवीमधील खेड गल्ली येथील मुंबई पब्लिक स्कूलमधील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला.
वांद्रे येथे निवडणूक आयोगाचे सदिच्छादूत क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी पत्नी अंजली व मुलगी सारा तेंडुलकर यांच्यासह मतदान केले. दिव्यांग मतदार सदिच्छादूत निलेश सिंगीत यांनीही मतदान केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्ट. जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांनीही मतदान केले. तसेच ज्येष्ठ गायिका आशा भोसले, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ – निवेदिता सराफ, अभिनेते नाना पाटेकर, प्रशांत दामले, सयाजी शिंदे, ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी गोखले, दिग्दर्शक केदार शिंदे यांनी पत्नी बेला शिंदे आणि मुलगी सनासह तर अभिनेते आदेश बांदेकर यांनीही पत्नी अभिनेत्री सुचित्रा बांदेकर आणि मुलगा सोहम बांदेकर यांच्यासह मतदानाचा हक्क बजावला. अभिनेता श्रेयस आणि दिप्ती तळपदे, अभिनेते अविनाश नारकर – अभिनेत्री ऐश्वर्या नारकर, सिद्धार्थ जाधव, निर्माती-अभिनेत्री मनवा नाईक आदी कलाकारांनी मतदानाचा हक्क बजावला.
हेही वाचा >>> दिल्ली जगातील सर्वांधिक प्रदूषित शहर; जगातील पहिल्या दहा प्रदूषित शहरांमध्ये देशातील आठ शहरे
मतदानासाठी बॉलिवूडकरांचीही गर्दी अभिनेता रणबीर कपूर, अभिनेत्री माधुरी दीक्षित, ट्विंकल खन्ना, ज्येष्ठ अभिनेत्री हेमामालिनी आणि मुलगी ईशा देओल, ज्येष्ठ अभिनेते परेश रावल, अनुपम खेर, अभिनेत्री रकुल प्रीत, निर्माता जॅकी भगनानी, अभिनेता तुषार कपूर, प्रसिध्द गीतकार गुलजार आणि त्यांची मुलगी दिग्दर्शिका मेघना गुलजार यांनी मतदानाचा हक्क बजावला. बुधवारी सकाळी सकाळी मतदान करणाऱ्यांमध्ये अभिनेता अक्षय कुमारही होता. अक्षयने मतदानाचा हक्क बजावत मतदान केंद्रावरील सोयी-सुविधांचेही कौतुक केले. एरवी पापराझींबरोबर गप्पा मारणाऱ्या रणबीरनेही यावेळी कोणाशी न बोलता थेट मतदान केंद्रांवर जाऊन मतदान करण्याला प्राधान्य दिले. अभिनेता राजकुमार रावनेही मतदानाचा हक्क बजावल्यानंतर लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले. अभिनेत्री श्रध्दा कपूरने मावशी अभिनेत्री पद्मिनी आणि तेजस्विनी कोल्हापुरे, भाऊ सिध्दांत कपूर यांच्याबरोबर मतदानाचा हक्क बजावला. अभिनेता फरहान अख्तर, जॉन अब्राहम, सोनू सूद, कार्तिक आर्यन, अभिनेत्री शर्वरी वाघ, ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे, प्रसिध्द दिग्दर्शक सुभाष घई यांच्यासह बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी मोठ्या संख्येने मतदान केले. अभिनेता सलमान खाननेही दुपारी वांद्रे येथे मतदान केले. अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करीना कपूर या दोघांनीही मतदान केले, या दोघांबरोबर सेल्फी काढण्यासाठी मतदान केंद्रावरील पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही गर्दी केली. अभिनेता शाहरुख खाननेही पत्नी गौरी आणि आर्यन-सुहाना या दोन्ही मुलांसह बुधवारी संध्याकाळी ५ वाजल्यानंतर वांद्रे येथील माऊंट मेरी चर्च परिसरातील मतदान केंद्रांवर मतदान केले.