मुंबई : मुंबईत सुरू असलेल्या प्रत्येक रस्त्याच्या कामाची सामर्थ्य चाचणी (कोअर टेस्ट) करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. मुंबई उपनगरात दोन ठिकाणी गुरुवारी या चाचणीला सुरुवात झाली आहे. मुंबईतील सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांची कामे पूर्ण झालेल्या, तसेच आगामी काळात होऊ घातलेल्या प्रत्येक सिमेंट काँक्रिट रस्त्याच्या कामांची सामर्थ्य चाचणी करणे अनिवार्य करण्यात येणार आहे. संकलित होणारे नमुने आयआयटी मुंबई तसेच शासकीय प्रयोगशाळांमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत.
हेही वाचा >>> परेल येथे झाड पडून महिला ठार; दोन दिवसांमध्ये वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये दोघांचा मृत्यू
मुंबईतील नागरिकांना चांगल्या प्रकारचे विशेषतः खड्डेमुक्त रस्ते मिळावे यासाठी मुंबई महानगरपालिकेने सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांची कामे हाती घेतली आहेत. या कामांमध्ये अधिक गुणवत्ता आणण्यासाठी आता सर्व रस्त्यांची सामर्थ्य चाचणी करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी घेतला आहे. गगराणी यांच्या निर्देशानुसार सोमवार, १ जुलै रोजी पश्चिम उपनगरात अंधेरी पूर्व येथील मांजरेकरवाडी मार्ग आणि विलेपार्ले येथील दीक्षित मार्ग येथे रस्ते विभागाकडून सामर्थ्य चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर उपस्थित होते. चाचणी करताना संयंत्राचा वापर करून सिमेंट काँक्रिटच्या रस्त्याचा वर्तुळाकार पद्धतीने भाग कापण्यात आला. हा भाग नमुना म्हणून बाहेर काढण्यात आला. त्यानंतर हे नमुने पुढील सामर्थ्य तपासणीसाठी भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी), मुंबई येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.
हेही वाचा >>> मुंबई : नव्या इमारतींची आयआयटीकडून तपासणी, ताबा घेतलेल्या म्हाडाच्या २०७ पैकी ९६ घरांमध्ये बदल
मुंबई महानगरात पहिल्या टप्प्याअंतर्गत एकूण ३२४ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यापैकी २९.३७ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. दुसऱ्या टप्प्यात नियोजित सिमेंट काँक्रिट रस्त्यांच्या कामाची निविदा प्रक्रिया सध्या प्रगतिपथावर आहे. या सर्व कामांची चाचणी करण्यात येणार आहे. सिमेंट काँक्रिटीकरण प्रकल्पातील संकलित होणारे नमुने आयआयटी मुंबई, तसेच शासकीय प्रयोगशाळांमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत. या नमुन्यांची सामर्थ्य तपासणी आयआयटी मुंबईच्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे. आयआयटीमार्फत या नमुन्यांचे परीक्षण व्हावे यासाठी महानगरपालिका पत्रव्यवहार करणार आहे.
सामर्थ्य चाचणी म्हणजे काय ?
सामर्थ्य चाचणी (कोअर टेस्टिंग मशीन) संयंत्राचा वापर करून सिमेंट काँक्रिटच्या रस्त्याचा भाग वर्तुळाकार पद्धतीने कापण्यात येतो. हा भाग नमुना म्हणून बाहेर काढण्यात येतो. काँक्रिटच्या भागाची सामर्थ्य चाचणी प्रयोगशाळेत करण्यात येते. काँक्रिट रस्त्यासाठी वापरण्यात आलेल्या साधनसामुग्रीचे गुणोत्तर, टिकाऊपणा, एकजिनसीपणा, भारवहन याअनुषंगाने विविध परिमाणांच्या निकषांवर सामर्थ्य चाचणी केली जाते.
या चाचण्यांमुळे कंत्राटदारांवर अधिकाधिक दर्जेदार कामे करण्याचे बंधन असणार आहे. कमी दर्जाचे काम चालणार नाही हा संदेशही कंत्राटदारांमध्ये जाईल. तसेच अशा गुणवत्ता चाचण्या सर्व कामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. अभिजीत बांगर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प)