लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : मुंबईतील रस्त्यांची कामे अत्युच्च व सर्वोत्तम दर्जाची व्हावीत यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या अभियंत्यांना आयआयटी, मुंबई या संस्थेतील तज्ज्ञ मंडळी प्रशिक्षण देणार आहेत. परिणामी, मुंबईकरांना भविष्यात चांगले रस्ते मिळू शकतील, असा आशावाद व्यक्त होत आहे.

रस्ते बांधणीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा, रस्ते बांधणी करताना काय करावे, काय करू नये, तसेच प्रत्यक्ष प्रकल्पस्थळी काम करणाऱ्या अनुभवी अभियंत्यांच्या शंकांचे निरसन व्हावे, यासाठी महानगरपालिका प्रशासनाने या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले आहे. या कार्यशाळेत एकूण ३०० अभियंत्यांना तंत्रशुद्ध व शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले जाणार आहे.

आणखी वाचा-मुंबई : १२ वर्षांच्या मुलावर अल्पवयीन मुलांकडून अत्याचार

मुंबईतील रस्ते आणि त्यावर पडणारे खड्डे यामुळे पालिका प्रशासनाला नेहमीच टीकेला सामोरे जावे लागते. तसेच मुंबई दरवर्षी मोठ्या प्रमाणावर होणारी अतिवृष्टी आणि वाहनांची वर्दळ यामुळे मुंबईतील रस्त्यांवर ताण अधिक असतो. त्यामुळे रस्ते बांधणी चांगली व्हावी याकरीता पालिका प्रशासनाने अभियंत्यांना प्रशिक्षण देण्याचे ठरवले आहे. मुंबई महानगरपालिकेने मुंबईतील सर्व रस्ते सिमेंट कॉंक्रिटचे करण्याचे ठरवले आहे. टप्प्याटप्प्याने सर्व रस्ते सिमेंट कॉंक्रिटचे केले जात आहे. हे रस्ते चांगल्या दर्जाचे व्हावेत याकरीता पालिकेने पवई येथील भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी, मुंबई) येथे शनिवार, २७ एप्रिल रोजी कार्यशाळा आयोजित केली आहे.

महानगरपालिका आयुक्त प्रशासक भूषण गगराणी यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यशाळेला सुरुवात होणार आहे. भारतीय तंत्रज्ञान संस्थेचे (आयआयटी) स्थापत्य अभियांत्रिकी विषयातील नामांकीत तज्ज्ञ प्रा. डॉ. के. व्ही. कृष्ण राव हे महानगरपालिका अभियंत्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेत महानगरपालिकेच्या १५० अभियंत्यांना सिमेंट कॉक्रिट रस्ते बांधणीचे तंत्रशुद्ध व शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले जाणार आहे.

आणखी वाचा-मुंबई : विमानतळावर बॉम्बची धमकी, गुन्हा दाखल

या कार्यशाळेत मार्गदर्शन, प्रशिक्षणाबरोबरच प्रत्यक्ष प्रकल्पस्थळी कार्यरत असणाऱ्या अभियंत्यांच्या विविध शंका, प्रश्न आदींचे आयआयटी, मुंबईतील तज्ज्ञ प्राध्यापक निरसन करणार आहेत. शनिवार, २७ एप्रिल २०२४ रोजी आयोजित कार्यशाळेत १५० स्थापत्य अभियंत्यांना, तर शनिवार, ४ मे २०२४ रोजी आयोजित कार्यशाळेत अन्य १५० स्थापत्य अभियंत्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cement concreting of roads 300 municipal engineers will be trained by experts from iit mumbai mumbai print news mrj