मुंबई : अंधेरी येथील महानगर दंडाधिकारी न्यायालयानजीकच्या रस्त्यावर पर्यावरणाच्या नियमांचे उल्लंघन करून अनेक झाडांच्या बुंध्यांशी सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. काँक्रीटीकरणामुळे झाडांची वाढ खुंटत असून ती सुकण्याचीही शक्यता असल्यामुळे पर्यावरणप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. तसेच, जबाबदार कंत्राटदाराविरोधात कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
महानगरपालिकेने मुंबईत मोठ्या प्रमाणात रस्ते काँक्रीटीकरणाची कामे हाती घेतली आहेत. विहित मुदतीत ही कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने कामांना वेग देण्यात आला आहे. मात्र, अनेकदा या कामांदरम्यान रस्त्यालगतच्या झाडांची कोणतीही काळजी घेतली जात नसल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींकडून करण्यात येत आहे.
नियमांना बगल
झाडांच्या बुंध्याशी काँक्रीटीकरण करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे झाडांची वाढ होत नाही. तसेच, त्यांच्या मुळांना पुरेशी हवा न मिळाल्याने झाडे सुकण्याची दाट शक्यता असते. झाडांच्या बुंध्याभोवती किमान एक मीटर खुली जागा ठेवणे अनिवार्य असल्याच्या सूचना राष्ट्रीय हरित लवादा आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आहेत. मात्र, रस्ते काँक्रीटीकरण करताना या नियमाला बगल देत झाडांच्या बुध्यालगत काँक्रीटीकरण केल्या जात असल्याचे निदर्शनास येत आहे.
कंत्राटदाराला २० हजार रुपये दंड
रस्त्याचे काँक्रीटीकरण करताना झाडाच्या बुंध्यालगत सीमेंट टाकल्यामुळे काही दिवसांपूर्वी विमानतळ प्राधिकरणाला महापालिकेच्या उद्यान विभागाने नोटीस बजावली होती. त्यानंतर प्रभादेवी येथेही अशीच घटना घडल्याने संबंधित कंत्राटदारावर नोटीस बजावून २० हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांनतर आता अंधेरीतही झाडांच्या बुंध्यांशी काँक्रीटीकरण करण्यात आल्याचे समोर आले आहे. महापालिकेच्या कंत्राटदारांकडून अनेकदा पर्यावरणविषयक नियम पायदळी तुडवले जात असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे.
बुंध्याभोवतीचे काँक्रीट, पेव्हर ब्लॉक काढावे
झाडांच्या बुंध्याभोवती केलेले काँक्रीटीकरण, बसवलेले पेव्हर ब्लॉक तातडीने काढून टाकावेत, भविष्यात रस्ते आणि पादपथांवरील झाडांभोवती कमीत कमी एक मीटर खुली जागा ठेवण्याच्या नियमानुसार काम करावे, तसेच अंधेरीतील अनधिकृत काँक्रीटीकरणाला जबाबदार असलेल्या कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात यावा, अशी मागणी वॉचडॉग फाऊंडेशनने केली आहे.
१५० कंत्राटदारांना नोटीस
रस्त्यांची कामे करताना झाडांच्या मुळांना इजा पोहोचवणाऱ्या कंत्राटदारांकडे महापालिकेच्या उद्यान विभाग आणि रस्ते विभागाचे लक्ष आहे. याप्रकरणी विविध विभाग कार्यालयांच्या हद्दीतील १५० कंत्राटदारांना नोटीस पाठवण्यात आल्या असून, या कंत्राटदारांकडून दंड वसूल करण्यात येणार आहे. यातील सर्वाधिक नोटीस या गोरेगाव विभागातील कंत्राटदारांना बजावण्यात आल्या आहेत. नागरी सोयींसाठी सुरू करण्यात आलेली विकासकामे आता पर्यावरणाचाच जीव घेऊ लागली आहेत.