मुंबई : अभिनेत्री कंगना राणावत दिग्दर्शित आणि सहनिर्मित इमर्जन्सी या चित्रपटातील काही दृश्यांना कात्री लावल्यास चित्रपटाच्या प्रदर्शनाला हिरवा कंदील दाखवण्यास हरकत नाही, अशी भूमिका सेन्सॉर मंडळाने (सीबीएफसी) गुरूवारी उच्च न्यायालयात मांडली. चित्रपटाच्या निर्मात्यांनी केलेल्या विनंतीनंतर न्यायालयाने त्यांना सेन्सॉर मंडळाच्या भूमिकेवर म्हणणे मांडण्यासाठी सोमवारपर्यंत वेळ दिला आहे.

चित्रपटातील काही दृश्य आणि संवादाना शिरोमणी अकाली दलासह शीख संघटनांनी आक्षेप घेतला आहे. चित्रपटात समाजाचे चुकीचे चित्रण केल्याचा आणि तथ्ये चुकीच्या पद्धतीने दाखविल्याचा आरोप करून संघटनेने मध्य प्रदेश उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्या न्यायालयाने शीख समुदायाचे म्हणणे ऐकण्याचे आदेश सेन्सॉर मंडळाला दिले होते. या पार्श्वभूमीवर सेन्सॉर मंडळाने चित्रपटाच्या प्रदर्शनाला प्रमाणपत्र देणे टाळले होते. त्यामुळे, प्रदर्शन प्रमाणपत्र मिळवण्यासाठी चित्रपटाच्या निर्मात्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्याची दखल घेऊन कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित करून चित्रपटाला प्रदर्शन प्रमाणपत्र नाकारणे योग्य नसल्याची टिप्पणी करून न्यायालयानेही सेन्स़ॉर मंडळाला याचिकाकर्त्यांच्या मागणीचा विचार करण्याचे आदेश दिले होते.

हेही वाचा >>> डॉ. अजित रानडे हे ७ ऑक्टोबरपर्यंत कुलगुरूपदी कायम; उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती

या पार्श्वभूमीवर गुरूवारी झालेल्या सुनावणीच्यावेळी याचिकाकर्त्यांसाठी चांगली बातमी आहे का? अशी विचारणा न्यायमूर्ती बर्गिस कुलाबावाला आणि न्यायमूर्ती फिरदोश पुनीवाला यांच्या खंडपीठाने सेन्सॉर मंडळाकडे केली. त्यावर मंडळाच्या फेरविचार समितीने आपला निर्णय घेतला आहे. त्यानुसार, चित्रपटाला प्रमाणपत्र देण्यापूर्वी त्यातील काही दृश्ये आणि संवाद कमी करण्यात यावेत, असे समितीने सुचवले आहे, अशी माहिती सेन्सॉर मंडळाच्यावतीने वकीस अभिनव चंद्रचूड यांनी न्यायालयाला दिली. तसेच, निर्मात्यांनी ही सूचना मान्य केल्यास चित्रपटाला प्रदर्शन प्रमाणपत्र देण्यास हरकत नाही, असे स्पष्ट करण्यात आले. त्यानंतर, या सूचनेबाबत विचार करण्यासाठी आणि भूमिका स्पष्ट करण्यासाठी सोमवारपर्यंतची मुदत देण्यात यावी, अशी विनंती याचिकाकर्त्यांच्यावतीने वरिष्ठ वकील शरण जगतियानी यांनी न्यायालयाकडे केली. ती मान्य करून न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी सोमवारी ठेवली.

हेही वाचा >>> Mumbai Local Train Updates : पावसामुळे १०० लोकल फेऱ्या रद्द; मेल-एक्स्प्रेस आठ तास खोळंबल्या

कोणत्या दृश्यांना कात्री लागणार?

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जीवनावर आधारित इमर्जन्सी या चित्रपटात संजय गांधी, ग्यानी झैल सिंग तसेच इंदिरा गांधी आणि लष्कराच्या उच्चपदस्थांमधील संवादातून “संत” आणि भिंद्रनवाले हे शब्द हटवण्यात यावेत, असे सेंन्सॉर मंडळाने सुचविले आहे. त्याशिवाय काही हिंसक दृश्ये तसेच शीख समुदायांशी संबंधित संवादही कमी करण्यात यावेत, अशी शिफारस केली आहे.