चित्रपट प्रमाणपत्र देताना कागदपत्रांमध्ये फेरफार करीत पक्षपातीपणा करताना अनेक निकषांना बिनदिक्कत डावलत प्रौढांसाठीच्या चित्रपटांचे रूपांतर पालकांच्या देखरेखीखाली (यूए) आणि सर्वासाठी (यू) दर्जाच्या चित्रपटांमध्ये केल्याबद्दल ‘कॅग’ने (नियंत्रक आणि महालेखापरीक्षक) सेन्सॉर बोर्डच्या कार्यशैलीवर ताशेरे ओढले.
सेन्सॉर बोर्ड कार्यकारिणीने संस्थेच्या कायदे आणि नियमांचे जाणूनबुजून दुर्लक्ष केले. त्यामुळे चित्रपटांना प्रमाणपत्र देताना अनियमितता आढळून आली. सेन्सॉर बोर्डाने प्रौढांसाठीच्या १७२ चित्रपटांचे रूपांतर पालकांच्या देखरेखीखाली दाखवल्या जाणाऱ्या चित्रपटांमध्ये केले, तर पालकांच्या देखरेखीखालच्या १६६ चित्रपटांचे रूपांतर सर्वासाठीच्या चित्रपटांमध्ये केले. हे करताना संस्थेने नियमांचा भंग केला. त्यामुळे चित्रपटाचे रूपांतर योग्य रीतीने झाले असे म्हणता येणार नाही, असे ‘कॅग’ने म्हटले आहे.
विहार दुर्वे या कार्यकर्त्यांने माहिती अधिकाराखाली केलेल्या अर्जाला ‘कॅग’ने उत्तर दिले आहे. त्यांच्या ७० पानी अहवालात बोर्डाच्या बेजबाबदार कार्यशैलीविषयी ताशेरे ओढले आहेत. सर्वासाठीच्या चित्रपटाच्या प्रदर्शनात त्यातील कोणतीही दृश्ये पाहण्यास बंदी घातलेली नसते. तर पालकांच्या देखरेखीखाली पाहिल्या जाणाऱ्या चित्रपटांना १२ वर्षांखालील मुलांना परवानगी दिली जात नाही. मात्र या नियमांना हरताळ फासला आहे.

Story img Loader