लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई: मुंबई महापालिका मुख्यालयासमोरील सर फिरोजशाह मेहता पुतळ्याला सोमवारी शंभर वर्षे पूर्ण झाली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात पालिका मुख्यालयासमोरील हा पुतळा मुंबईची खास ओळख आहे. सामुदायिक वर्गणीतून ऐंशी हजार रुपये संकलित करून ३ एप्रिल १९२३ रोजी या पुतळ्याचे समारंभपूर्वक अनावरण करण्यात आले होते. त्या ऐतिहासिक दिवसाला आज शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत.
‘मुंबईचा सिंह’ म्हणून इतिहासात अढळ स्थान मिळवलेले, मुंबई महानगरपालिका अधिनियमाच्या निर्मितीत मोलाची भूमिका बजावणारे सर फिरोजशाह मेहता यांचा पूर्णाकृती पुतळा बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयासमोर शंभर वर्षांपूर्वी उभारण्यात आला. त्या निमित्ताने महानगरपालिकेच्यावतीने पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी सकाळी अभिवादन केले. त्यावेळी पालिकेचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
आणखी वाचा- मुंबई: सुनावणी पुढे ढकलल्याने आरोपीची सटकली, थेट चप्पल काढून न्यायाधीशांवर…
बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावरील सर फिरोजशाह मेहता यांचा पूर्णाकृती पुतळा म्हणजे मुंबईची ओळख आहे. फिरोजशाह मेरवंजी मेहता यांचा जन्म ४ ऑगस्ट १८४५ रोजी मुंबईत झाला. अतिशय तल्लख बुद्धिमत्ता लाभलेले फिरोजशाह मेहता यांनी मुंबई महानगरपालिका अधिनियमाच्या निर्मितीत सर्वात मोठे योगदान दिले आणि त्याचा पाया रचला. करदात्यांचे प्रतिनिधित्व असणारे नागरी प्रशासन असले पाहिजे, ही त्यांची भूमिका ब्रिटिशांना मान्य करावी लागली आणि लोकप्रतिनिधीत्व असणारे नागरी प्रशासन लाभले. फिरोजशाह मेहता यांचे विचार १८७२ च्या महानगरपालिका अधिनियमात समाविष्ट करण्यात आले आणि त्यातून नागरी स्वातंत्र्याचे बीजारोपण झाले. अधिनियम तयार करणाऱ्या परिषदेचे मेहता हे स्वतः सदस्य होते. नवीन म्युनिसिपल कायद्याच्या चर्चेत ते कायम नागरिकांच्या व करदात्यांच्या बाजूने बोलत.
आणखी वाचा- मुंबई: समृद्धी महामार्गावर लवकरच वाहनांद्वारे पोलीस गस्त
भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिका हा मैलाचा दगड मानला जातो तसा बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम हा देखील आदर्शवत मानला जातो. महानगरपालिकेत सर फिरोजशाह मेहता यांना सभापती या नात्याने सन १८८४-८५ व १८८५-८६ अशी सलग दोन वर्षे, तर अध्यक्ष या नात्याने सन १९०५-०६ आणि त्यानंतर पुन्हा एकदा १९११-१९१२ अशी दोन वर्षे, असे मिळून एकूण चार वर्षे मुंबई महानगराचा प्रथम नागरिक होण्याचा बहुमान मिळाला. महानगरपालिकेच्या इतिहासातील हे पहिलेच उदाहरण होते. या सर्व योगदानामुळे फिरोजशाह मेहता यांना ‘मुंबईतील नागरी शासनाचे पिता’ हे सार्थ नाव मिळाले.
सर फिरोजशाह मेहता हे दिनांक ५ नोव्हेंबर १९१५ रोजी कालवश झाले. त्यानंतर, त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयासमोर पूर्णाकृती पुतळा उभारला गेला. दिनांक ३ एप्रिल, १९२३ रोजी या पुतळ्याचे समारंभपूर्वक अनावरण करण्यात आले. त्या ऐतिहासिक दिवसाला आज शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत.