नमिता धुरी

साहित्य, सांस्कृतिक संवर्धनासाठी कार्यरत असणाऱ्या ‘द एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई’च्या सार्वजनिक ग्रंथालयाला टाळेबंदीचा फटका बसला आहे. केंद्र शासनाने आणि महापालिकेने अनुदानात कपात केली असून २१६ वर्षांची परंपरा असणाऱ्या या ब्रिटिशकालीन ग्रंथालयाला आता कर्मचाऱ्यांचे वेतन देणेही कठीण झाले आहे.

सभासद नोंदणी, केंद्र सरकारकडून मिळणारे १ कोटी रुपयांचे वार्षिक अनुदान आणि पालिके कडून पुस्तक खरेदीसाठी मिळणारे २० लाख रुपये हे एशियाटिक ग्रंथालयाच्या उत्पन्नाचे प्रमुख स्रोत आहेत. यंदा टाळेबंदीमुळे या सर्वच स्रोतांतून मिळणारे उत्पन्न घटले आहे. केंद्र सरकारने अनुदानात ४० टक्के कपात केली तर, पालिके कडून के वळ ५ लाख रुपये प्राप्त झाले. टाळेबंदीमुळे नवे सभासद ग्रंथालयाला मिळू शकले नाही. ग्रंथालय चालवण्यासाठी वर्षभरात साधारण २ कोटी रुपये खर्च येत असल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्ष प्रा. विस्पी बालापोरिया यांनी दिली.

कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात

संस्थेचा कारभार सुरळीतपणे चालण्यासाठी अविरत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनावर सध्याच्या बिकट आर्थिक स्थितीचा परिणाम होत आहे. संस्थेकडे ३० नियमित आणि ३ कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत. हे सर्वजण गेल्या अनेक महिन्यांपासून ४५ टक्के वेतनावर काम करत आहेत. कर्मचाऱ्यांचे वेतन हा संस्थेसमोरील सर्वात मोठा प्रश्न असल्याचे बालापोरिया यांनी सांगितले. संस्थेच्या २ सभासदांनी प्रत्येकी ५ लाख रुपये देणगी संस्थेला दिली आहे; मात्र संस्थेची गरज मोठी असल्याने इतर सभासदांनाही मदतीसाठी आवाहन करण्यात आले आहे.

टाळेबंदीतही कार्यरत

टाळेबंदीच्या काळातही आपल्या सभासदांना बौद्धिक खाद्य पुरवण्याचे काम ग्रंथालयाने सुरू ठेवले. संस्थेचा २१६वा स्थापना दिन, डॉ. अरूण टिके कर स्मृती संशोधन अभ्यासवृत्ती, जश्न-ए-दास्ता-ए- मुंबई, परिसंवाद, ऐतिहासिक वारसा पर्यटन असे सर्व उपक्रम सुरू राहिले.

दुर्मीळ ग्रंथसंपदा

एशियाटिक ग्रंथालयात सध्या एक लाख ग्रंथ आहेत. प्राचीन आणि आधुनिक भारतीय भाषा, ग्रीक, लॅटीन, इटालियन, जर्मन, फ्रेंच भाषांतील ग्रंथही येथे आहेत. यातील १५ हजार दुर्मीळ ग्रंथांमध्ये काही प्राचीन भारतीय आणि युरोपीय ग्रंथांच्या पहिल्या आवृत्त्या आहेत. ही मौल्यवान ग्रंथसपदा जपण्यासाठी, त्यांचे संगणकीकरण करण्यासाठी संस्थेला मोठय़ा प्रमाणावर आर्थिक मदतीची गरज आहे.

सर जेम्स मॅकिन्टोश यांनी १८०४ साली ‘लिटररी सोसायटी ऑफ बॉम्बे’ची स्थापना के ली. प्राच्यकला, विज्ञान, वाङ्मय यांतील संशोधनाला प्रोत्साहन देणे हा या संस्थेच्या स्थापनेमागील उद्देश होता. विविध साहित्यिक संस्थांना सामावून घेत १९५४ साली ‘लिटररी सोसायटीचे रूपांतर एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई’मध्ये झाले. संख्याशास्त्र, मानववंशशास्त्र, इतिहास, पुरातत्त्व, भाषाशास्त्र, मानवशास्त्र, नैसर्गिक इतिहास, भूगर्भशास्त्र, तत्त्वज्ञान, साहित्य, धर्मशास्त्र आदी अनेक क्षेत्रांशी संबंधित प्राचीन आणि आधुनिक ग्रंथ एशियाटिक सोसायटीच्या ग्रंथालयात आहेत.

Story img Loader