देशात इंधनाच्या दरात सतत वाढ सुरू आहे. त्यामुळे सामान्य नागरिक हैराण झाले आहेत. दररोज सुरू असलेल्या दरवाढीमुळे रविवारी दिल्लीत पेट्रोलच्या दरांनी लिटरला ९५ रुपयांचा, तर डिझेलच्या दरांनी ८६ रुपयांचा टप्पा ओलांडला. देशातील सहा राज्यांमध्ये पेट्रोलने शंभरी पार केली आहे. यामध्ये महाराष्ट्राचा देखील समावेश आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात पेट्रोल शंभरीपार गेले आहे. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. केंद्र सरकारने एक्साईजमध्ये वाढ करून लूट केल्याचा आरोप चव्हाण यांनी केला आहे.
अशोक चव्हाण म्हणाले, “आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्या असतानाही केंद्र सरकारने त्याचा पुरेसा लाभ देशातील ग्राहकांना मिळू दिला नाही. उलटपक्षी एक्साईजमध्ये वाढ करून लूट केली. त्यामुळेच महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत पेट्रोल शंभरीपार तर डिझेल नव्वदीत पोहोचले आहे.”
अशोक चव्हाण यांनी ट्विटरवर एक ग्राफ शेअर केला आहे. ज्यामध्ये राज्यातील ३२ जिल्ह्यात पेट्रोल दरवाढ झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मागील वर्षभरात झालेली पेट्रोल दरवाढीची आकडेवारी यामध्ये दिली आहे. ४ मेपासून विसाव्यांदा करण्यात आलेल्या या दरवाढीमुळे देशभरातील इंधनाच्या दरांनी ऐतिहासिक विक्रम केला आहे. पेट्रोल लिटरला १०० रुपयांहून अधिक दराने विकले जात असलेले मुंबई हे २९ मे रोजी देशातील पहिले महानगर ठरले होते. मुंबईत आता पेट्रोलसाठी लिटरला १०१.३ रुपये, तर डिझेलसाठी लिटरमागे ९३.३५ रुपये मोजावे लागत आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्या असतानाही केंद्र सरकारने त्याचा पुरेसा लाभ देशातील ग्राहकांना मिळू दिला नाही. उलटपक्षी एक्साईजमध्ये वाढ करून लूट केली. त्यामुळेच महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत पेट्रोल शंभरीपार तर डिझेल नव्वदीत पोहोचले आहे. pic.twitter.com/WHuVxczjZq
— Ashok Chavan (@AshokChavanINC) June 7, 2021
चंद्रकांत पाटलांचा राज्यसरकारला सल्ला
दरम्यान, इंधन दरवाढीप्रकरणी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सरकारला चांगलंच सुनावलं आहे. इंधन दरवाढ झाली म्हणून सरसकट केंद्राकडे बोट दाखवणं चुकीचं असल्याचंही ते म्हणाले. राज्यासह देशातही काही ठिकाणी इंधनाचे भाव गगनाला भिडलेले आहेत.
हेही वाचा – देशातील सहा राज्यांमध्ये पेट्रोलचे दर शंभरीपार
इंधन दरवाढीवरुन राज्य सरकार केंद्राला जबाबदार धरत आहे, हे चुकीचं आहे. त्याचसोबत राज्याने केंद्राकडे बोट दाखवण्यापेक्षा आपला कर कमी करावा म्हणजे इंधनाचे दर कमी होतील, असा सल्लाही पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे.