पावसाने मंगळवारी थैमान मांडूनही रेल्वेसेवा अगदी सुरळीत सुरू होती. एरवी थोडय़ाश्या पावसानेही पाणी तुंबून खोळंबणाऱ्या मध्य रेल्वेवरील वाहतूकही मंगळवारी धीमी का होई ना, पण सुरू होती. पश्चिम रेल्वेही सुरळीत सुरू होती. तर वडाळा, चुनाभट्टी व कुर्ला या स्थानकांदरम्यान पाणी तुंबल्याने हार्बर मार्गावरील वाहतूक अडीच तास ठप्प होती. हार्बर मार्गावरील प्रवाशांनी आपापली घरे गाठण्यासाठी ‘मेन लाइन’चा आधार घेतल्याने मध्य रेल्वेवर सेवेवर ताण पडला होता.
सोमवारी रात्रीपासूनच सुरु झालेल्या संततधारेने मंगळवारी आणखीनच जोर पकडला. त्यात समुद्रालाही भरती आली. या सर्व पाश्र्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने आपल्या बाजूने सर्व तयारी ठेवली होती. पावसाचा जोर वाढू लागल्यानंतर सायन, कुर्ला, परळ, चुनाभट्टी, वडाळा या सखल भागांत रेल्वेमार्गावर पाणी साचण्यास सुरुवात झाली. त्यामुळे या पट्टय़ात गाडय़ा धीम्या गतीने धावू लागल्या. वडाळा-चुनाभट्टी-कुर्ला या भागांत जास्त पाणी साचल्याने दुपारी अडीचच्या हार्बर मार्गावरून पनवेलच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प झाली.
पाणी ओसरण्यास तब्बल अडीच तासांचा अवधी लागल्यानंतर सायंकाळी पाचच्या सुमारास ही वाहतूक हळूहळू पूर्ववत करण्यात यश आले. मात्र तोपर्यंत हार्बर मार्गावरील ७० सेवा रद्द करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी अनिलकुमार जैन यांनी दिली. याच दरम्यान मेन लाइनवरील २८ सेवाही रद्द करण्यात आल्या. सायंकाळी कार्यालये सुटल्यानंतर मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे अभूतपूर्व गदी जमली होती. हार्बर मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली नसल्याने हार्बरच्या प्रवाशांनी मेन लाइनवरूनच प्रवास करणे पसंत केले. त्यामुळे मेन लाइनच्या गाडय़ांमध्येही जास्त गर्दी होती. पश्चिम रेल्वेवर मात्र रेल्वेमार्गावर पाणी तुंबण्याच्या घटना कुठेही घडल्या नाहीत, असा दावा पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी नितीन डेव्हिड यांनी केला. मात्र तरीही येथेही १०-१५ फेऱ्या रद्द कराव्या लागल्या.

Story img Loader