केंद्र सरकारच्या उदासीनतेमुळेच मुंबई-गोवा महामार्गचे चौपदरीकरण रखडले आहे, असा थेट आरोप सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी मंगळवारी विधान परिषदेत केला. कोकणवासीयांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या या महामार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारशी लढाईच करावी लागेल. त्यासाठी सर्वपक्षीय आमदारांनी तयार राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.
जगबुडी नदीपुलावरील खासगी बसच्या भीषण अपघाताच्या पाश्र्वभूमीवर विधान परिषदेत कोकणात सातत्याने होणाऱ्या अपघातांवर चर्चा घेण्यात आली. या चर्चेत भाई गिरकर, भाई जगताप, किरण पावस्कर, रामदास कदम, विनायक राऊत, प्रकाश बिनसाळे, दिवाकर रावते आदी सदस्यांनी भाग घेतला. कोकणातील अरुंद व खराब रस्त्यांमुळे अपघात वाढले असल्याचे सदस्यांनी सांगितले.
या चर्चेला उत्तर देताना भुजबळ म्हणाले सदर महामार्ग हा केंद्र सरकारचा प्रकल्प आहे व त्यांनीच तो पूर्ण करायचा आहे. सुमारे ४ हजार कोटी रुपये खर्चाच्या महामार्गाच्या कामाला २००४ मध्ये मंजुरी देण्यात आली. परंतु गेली ९वर्षे पळस्पे ते इंदापूर या पहिल्या टप्प्याचेच काम सुरू आहे. केंद्र सरकारच्या आदेशानुसार या महामार्गाच्या कामाच्या निविदा काढल्या, कंत्राट निश्चित केले. परंतु आता त्याला मंजुरी देण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. यासाठी तफावत निधी म्हणून १२५० कोटी रुपये केंद्राकडून मिळणे अपेक्षित आहे. परंतु सरकार त्याबाबत काहीच निर्णय घेत नाही. विचारणा केली असता दुसऱ्या टप्प्यातील योजनेत या महामार्गाचा समावेश करण्यात येईल, असे सांगण्यात आले. राज्य सरकारच्या ताब्यात हा प्रकल्प द्या या मागणीलाही मान्यता मिळत नाही, असे ते म्हणाले.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वारंवार होणाऱ्या भीषण अपघातांबाबत लोकसभेत मंगळवारी सदस्यांनी चिंता व्यक्त केली. सरकारने या महामार्गाचे आणि त्यावरील पुलांचे रुंदीकरण करण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी सदस्यांनी केली. सदर महामार्ग अत्यंत गजबजलेला असल्याने सरकारने रस्ता आणि पुलांच्या रुंदीकरणासाठी तातडीने पावले उचलावी, अशी मागणी काँग्रेसचे खासदार फ्रान्सिस्को सारदिन्हा यांनी सभागृहात शून्य प्रहरात केली. रस्ते आणि पुलांची स्थिती सुधारण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची विनंती त्यांनी भूपृष्ठ वाहतूक मंत्र्यांना केली. शिवसेनेचे अनंत गिते यांनी महामार्गावर वाहतुकीच्या उत्तम सुविधा पुरविण्याची मागणी केली.
आजारी वडिलांची भेट शेवटचीच ठरली
आजारी वडिलांना भेटण्यासाठी रवींद्र सावंत गावी गेले होते. वडिलांची भेट झाली पण ती त्यांची शेवटचीच भेट ठरली. महाकाली ट्रॅव्हल्सची बस जगबुडी नदीमध्ये कोसळली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अंधेरीच्या वीरा देसाई रोड येथे राहणारे रवींद्र वासुदेव सावंत स्टेट बँकेमध्ये नोकरी करत होते. रविवारी कणकवली येथे वडिलांना भेटून त्यांनी सोमवारी रात्री मुंबईला परतण्यासाठी बस पकडली. आपण सकाळी घरी परतत असल्याचा त्यांचा दूरध्वनी आला होता. रवींद्र सावंत यांच्या पश्चात पत्नी आणि १९ वर्षांंचा एक मुलगा असा परिवार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा