प्रतिनिधी, मुंबई
दक्षिण मुंबई आणि जेएनपीटी बंदरादरम्यानचा प्रवास कितीतरी जलद करणाऱ्या आणि शहरांतर्गत वाहतूक कोंडीचा भार हलका करणाऱ्या शिवडी ते न्हावाशेवा सागरी सेतू प्रकल्पासाठी व्यवहार्यता तफावत निधी देण्यास केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या समितीने मंगळवारी तत्त्वत: मान्यता दिली. त्यामुळे या प्रकल्पाच्या मार्गातील मोठा अडसर दूर झाला आहे. शिवडी ते न्हावाशेवादरम्यानचा २२ किमी लांबीचा हा सागरी सेतू देशातील सर्वाधिक लांबीचा सागरी सेतू असून मुंबई महानगर प्रदेशातील हा सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानला जातो. या २२ किलोमीटर लांबीच्या प्रकल्पासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. खासगी-सरकारी भागीदारी तत्त्वावर तो उभारण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे ९६३० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यासाठी २० टक्के निधी व्यवहार्यता तफावत निधी (व्हीजीएफ) म्हणून मिळावा अशी प्राधिकरणाची मागणी होती. यासंदर्भात प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंगळवारी दिल्लीत केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या समितीसमोर म्हणणे मांडले. त्यानंतर या प्रकल्पाला व्यवहार्यता तफावत निधी देण्यास अर्थमंत्रालयाच्या समितीने तत्त्वत मान्यता दिली, असे प्राधिकरणातर्फे सांगण्यात आले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा